Breaking News

फरहान सय्यदने पटकाविला ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’चा बहुमान

नवी मुंबई, दि. 07, मार्च - 180 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ किताब पुण्याच्या महेंद्र चव्हाण या शरीरसौष्ठवपटूने 1 लक्ष 25 हजार पारितोषिक रक्कमेसह पटकाविला. ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ पुरस्काराचा 50 हजार रक्कमेच्या पुरस्काराचा मानकरी फरहान सय्यद ठरला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र बॉडी बिल्डींग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार संजीव नाईक यांनी कोणताही उपक्रम सातत्याने सुरू ठेवणे ही मोठी गोष्ट असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेने 1996 पासून सातत्याने महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करून शहरातील व्यायामप्रेमी तरूणांचा उत्साह वाढविला आहे तसेच राज्यातील शरीरसौष्ठवपटूंनाही प्रोत्साहित केले आहे याबद्दल कौतुक केले.
‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ शरीरसौष्ठव किताबाचा मानकरी महेंद्र चव्हाण याने आपल्या मनोगतात मागील 11 वर्षांपासून या स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगत या स्पर्धेची आम्हां शरीरसौष्ठवपटूंच्या मनात एक वेगळी प्रतिमा असून या स्पर्धेची आम्ही सर्वजण वाट पाहत असतो असे मत मांडले. या स्पर्धेचे टायटल मारायचे हे माझे 11 वर्षांपासून स्वप्न होते, अनेकदा ते स्वप्न अपूर्ण राहिले मात्र जिद्द सोडली नाही अखेरीस आज ते स्वप्न पूर्ण झाल्याचा वेगळा आनंद होत असल्याचे त्याने सांगितले.