Breaking News

शेतक-यांच्या मोर्चाला राहुरीकरांचा जाहीर पाठिंबा स्थानिक प्रशासनाला दिले निवेदन


किसानसभेच्यातर्फे मुंबईत काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाला राहुरी तालुक्यातील शेतक-यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. सत्ताधारी राज्यसरकारच्या फसव्या भूमिकेचा निषेध करत राहुरीचे तहसिलदार अनिल दोंडे यांना निवेदन देण्यात आले. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विविध संकटांमुळे शेतकरी हलबल झाला आहे. सरकार मात्र शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी सातत्यानेफसव्या घोषणा करत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.राज्यातील शेतक-यांची बिकट परिस्थिती सुधारावी म्हणून हे जन आंदोलन सुरु आहे.

 आंदोलनास पाठींबा देण्याचे नैतिक कर्तव्य आम्ही पार पाडत आहोत. शेतमालाला दिडपट भावाची हमी द्यावी, शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू कराव्या, दुधाला ४० रु प्रतिलिटर हमी भाव मिळावा, सध्या कसत असलेल्या वनजमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी दमणगंगा, पिंजाळ आदी नद्यांचे अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून पूर्वेकडील गिरणा, गोदावरी खोऱ्यात वळवावे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचा गरजू आणि पात्र व्यक्तिंना तात्काळ लाभ द्यावा, ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांच्या जिर्ण शिधापत्रिका बदलून द्याव्यात, शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करावी या आदी मागण्या शासनाने मान्य कराव्यात. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, रास्तारोको, उपोषण अथवा लोकशाही मार्गाने होणारे कोणतेही आंदोलन यानंतर प्रशासनास कोणतीही पुर्वसूचना न देता केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती रविंद्र आढाव, शेतकरी संघटनेचे रवि मोरे, अनिल इंगळे, छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री देवेंद्र लांबे, ब्राम्हणीचे उपसरपंच डॉ. राजेंद्र बानकर, राहुरी कारखान्याचे संचालक भारत तारडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव राजेंद्र खोजे, मराठा एकिकरण समितीचे सचिन ठुबे, दिनेश वराळे, अशोक कदम, सतिष तारडे, उमाकांत हापसे, राजाबाबू हापसे, निलेश हापसे, अरुण डौले, सचिन खांदे आदीसंह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.