Breaking News

भालके व दहातोंडे वस्तीत सिंगल फेज योजना बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारातच


चांदा /प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील चांदा परिसरातील भालके व दहातोंडे वस्ती वरील सिंगल फेज रोहित्र जळाल्याने गेल्या पाच महिन्यापासून या वस्तीवर अंधार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

भालके दहातोंडे वस्ती व खडकवाडी रस्ता या ठिकाणी मोठी लोकवस्ती असून स्वतंत्र सिंगल फेज योजना असून त्या ठिकाणचे रोहित्र गेल्या पाच महिन्यापासून जळाल्याने शालेय विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासच करता येत नाही. सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे. तसेच पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ आली आहे. त्यांना रात्री अभ्यास करण्यासाठी वीज बंद असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वाटू लागली आहे . तब्बल पाच महिन्यापासून या भागात अंधार असल्यामुळे वीज ग्राहकांकडून प्रचंड चीड वक्त होत आहे. याबाबत या भागातील नागरिकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते देखील उडवा उडवीचे उत्तरे देतात. असे या भागातील वीज ग्राहक सांगतात. एका अधिकाऱ्याला याबाबत विचारणा केली की, तो अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याचे नाव सांगतो. असे का हे अधिकारी वागतात. या संदर्भात या भागातील वीज ग्राहकांनी तालुक्यातील लोक प्रतिनिधींशी संपर्क साधून बंद पडलेल्या सिंगल फेजचे जळालेले रोहित्र संदर्भात अडचणी सांगितल्या. पण त्यांचा देखील काही परिणाम झाला नाही. आम्ही वीज बिल वेळेत भरतो, आम्हाला असे वीज वितरणाने का अंधारात ठेवले?असे या बाबत एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. भालके व दहातोंडे वस्ती, खडकवाडी रस्ता परिसरात अनेक वीज ग्राहक आहेत. त्यांचे या अंधाराच्या साम्राज्यामुळे प्रचंड हाल होतात. लवकरात लवकर या भागातील सिंगल फेज योजनेचे रोहित्र बसवून आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे न्यावे. अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.