Breaking News

अखेर चांदणी चौकातील भूसंपादन सुरू

पुणे : चांदणी चौक उड्डाणपुलासाठी अखेर भूसंपादन सुरू झाले आहे. या रस्त्याच्या कामात येणार्‍या 67 सदनिकाधारकांपैकी 56 सदनिका धारकांना भूसंपादनापोटी तब्बल 54 कोटी 82 लाख रुपये देण्यास मान्यता देण्यात आली. तर उर्वरीत 9 सदनिकाधारकांना 22 कोटींचा मोबदला देणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लटकलेले भूसंपादनाचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले आहे.चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे-बंगळुरू महामार्गावर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याचे भूमिपूजन मागी वर्षी सप्टेंबर 2017 मधे झालेले आहे. मात्र, या पुलासाठीची जागाच अजून महापालिकेने ताब्यात घेतलेली नसल्याने हे काम सुरूच झालेले नाही. या पुलासाठी 13.92 हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यातील 2 हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. तर उर्वरीत जागेवर सुमारे 67 घरे आणि दोन बंगले आहेत. तर काही जागेवर रस्त्याचे आरक्षण आहे. त्यामुळे ज्या नागरिकांची घरे या पुलाच्या कामात बाधित होणार आहेत. त्यांना रोख मोबदला दिला जाणार आहे. त्यासाठी स्थायी समितीने नुकतीच 80 कोटींच्या वर्गीकरणास मान्यता दिली होती. या निधीतून हा भूसंपादनाचा खर्च सदनिकाधारकांना दिला जाणार आहे. या भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाकडून महिनाभरापूर्वी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार, तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.