Breaking News

स्वस्तात जमीन देण्याच्या बहाण्याने साडेतीन कोटींची फसवणूक

पुणे : एम. जी. प्रॉपटी कंपनीच्या माध्यमातून कोकणात स्वस्तात सुलभ हप्त्याने जमीन उपलब्ध करुन देतो असे सांगून, सदर जमीन नागरिकांनी विकत घेतल्यास त्या भाडे तत्वावर घेऊन त्या बदल्यात दरमहा त्याचे भाडे देईल असे सांगून सुमारे 300 जणांना साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घालून एक भामटा पसार झाला होता. फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी त्याचा शोध घेत त्यास लोणावळयातून ताब्यात घेत पुण्यात आणून बंडगार्डन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मोहन जयंता गायकवाड (रा. धानोरी,पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 


त्याच्यासह शबाना शेख, अभय भामे, विकास मोरे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत चैत्राली शिंदीकर (रा. कोंढवा, पुणे) यांनी पोलिसांकडे सप्टेंबर 2017 मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिंदीकर यांना त्यांचे सोसायटीतील एका रहिवासी मार्फत सन 2016 मध्ये एम. जी. प्रॉपर्टीज बाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्या आणि त्यांचे पती महेश गायकवाड यांना साधु वासवाणी चौकातील परमार ट्रेड सेंटर मधील कार्यालयात भेटण्यास गेले. त्यावेळी गायकवाडने त्यांच्याशी बोलणी करुन शेतीत गुंतवणूक केल्यास एकरी दरमहा आठ हजार रुपये भाडे मिळेल असे सांगितले. पोलादपुर जवळील ढवळे यागावी शेतजमीन असल्याचे सांगत त्याठिकाणी मधुतुळस आणि मोहगनी या झाडांची लागवड करुन मधुतुळस ही औषधी वनस्पती आहे आणि ती दर तीन महिन्यात काढून आपण विकू शकतो, त्यातून येणारी रक्कम ही त्याच्या लागवडीसाठी लागणारी रक्कम यात बरीच तफावत असते त्यातून मुबलक पैसे दर तीन महिन्यात मिळतील म्हणजे आम्ही तुम्हाला तुमच्या खात्यात दर तीन महिन्याला तुम्ही गुंतवलेल्या शेतीचे दर एकरी भाडे जमा करु शकतो असे गोड बोलून सांगितले.त्यानंतर शिंदीकर यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून दहा लाख रुपये गुंतवले. त्यानंतर गायकवाड यांचे कार्यालयातील मॅनेजर सोबत रायगडच्या पायथ्याशी नदी किनार्‍याची जागा बघण्यासाठी ते गेले. मात्र, त्यानंतर खरेदीखत न करता अथवा पैसे परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली. अशाचप्रकारे इतर 16 जणांची स्वस्तात जमीन देण्याचे बहाण्याने 63 लाख 40 हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे.