Breaking News

विविध सुधारणांमुळे पावसाळ्यात मिळणार अखंडित वीज !

डोंबिवली, दि. 08 मार्च - महावितरण कंपनीने डोंबिवलीतील विज पुरवठा कायम अखंडित रहावा यासाठी सुमारे 24 कोटी रुपयांच्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. येत्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणार आहेत. सध्या बाजी प्रभु चौकातील वीज पुरवठा नियंत्रित करणारे 25 ब्रेकर हे सुमारे 30 वर्षापूर्वीचे असून ते बदलण्याचे काम वीज पुरवठा खंडित न करता केले जात आहे. आतापर्यत 11 ब्रेकर बसवण्यात आले असून उरलेले काम येत्या आठवडयात पूर्ण होणार आहे.


या संदर्भात डोंबिवली महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी सांगितले कि, पश्‍चिम डोंबिवलीत सध्या ओव्हरडेड वायर्स असून 56 कि. मी. भूमिगत करण्यात येणार आहेत. तर अधिक क्षमतेची जनित्रे (ट्रान्सफार्मर) बसविण्यात येणार आहेत. पश्‍चिम डोंबिवलीत सध्या एकच वीज पुरवठा करणारे उपकेंद्र असून गणेश मंदिर येथे दुसरे उपकेंद्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे पश्‍चिमेला वीज पुरवठयात सुधारणा होईल. डोंबिवलीत सुमारे 1 लाख 80 हजार वीज ग्रहक असून दरमहा सुमारे 22 कोटी बिले जमा होत असून केवळ एक टक्का वीज थकीत असल्याचे त्यानी पुढे सांगीतले.
मोबाईल अ‍ॅपचा मोठा उपयोग :
डोंबिवलीतील 1 लाख 80 हजार वीज ग्राहकांपैकी सुमारे 1 लाख 60 हजार ग्राहक महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपचा वापर करत असतात. अ‍ॅपव्दारे ग्राहकांना मासमेसेज, वीज पुरवठा खंडित होणार असेल तर पूर्व सूचना, मोबाईल मार्फत बिल जमा करण्याच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्हयात डोंबिवलीचा अशा बाबत प्रथम क्रमांक लागतो असेही त्यानी सांगितले.