Breaking News

सह्याद्री पोलिस विश्रांतीगृह नुतनीकरणाचे उद्घाटन उत्साहात


सातारा  - सातारा जिल्हयातील पोलिस कर्मचारी यांच्यासाठी राज्य शासनाने 700 घरकुले मंजुर करून या प्रकल्पासाठी 175 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. ही योजना संपुर्ण राज्यात राबविली जात आहे. याशिवाय पोलिस कर्मचारी यांना गृहकर्जही तात्काळ मिळणार असल्याची माहिती गृह विभागाचे अप्पर गृहसचिव सुधिरकुमार श्रीवास्तव यांनी येथे बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचारी व नागरीकांशी थेट संवाद साधताना अप्पर सचिव श्रीवास्तव म्हणाले की, आज पोलिस दलासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. निश्‍चित वेळेपेक्षा अधिकतास पोलिस कर्मचा-यांना काम करावे लागते. त्यामुळे अनेक अधिकारी व पोलिस कर्मचारी हे तणावात असतात. याचा  त्यांच्या आरोग्यावर व कुटूंबाच्या स्वास्थ्यावर परीणाम होतो. यावर गांभिर्याने विचार केला जात आहे. कामाचे तास कमी करणे व जादा काम केले तर अधिक मोबदला देणे हे निर्णय पोलिस दलाने घेतले आहेत. या शिवाय पोलिसांना राहण्यासाठी पोलिस दलामार्फत घरे देण्यात येत आहेत. अनेकांना आपल्या हक्काचा निवारा हवा आहे. त्यासाठी पोलिस कर्मचारी यांना विनासायास गृह कर्ज मिळाले पाहिजे. यासाठी राज्य शासनाने योजना सुरू केली आहे. याचा लाभ पोलिस कर्मचारी घेत आहेत. सातारा जिल्हयातील अशी काही प्रकरणे प्रलंबित असतील तर ती तातडीने मंजुर क रण्यात येतील, अशी ग्वाही ही श्रीवास्तव यांनी यावेळी दिली. महाबळेश्‍वर येथील पोलिस कर्मचारी यांच्यासाठी काही घरकुले बांधण्यात आली आहेत. उरलेली घरकुलेही लवकर बांधली जातील. या प्रकल्पात काही अडचणी आल्या असतील त्या अडचणीही तातडीने सोडविण्यात येतील, असेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. प्रारंभी गृह विभागाचे अप्पर गृह सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांनी विश्रांतीगृहाचे तसेच पोलिस घरकुलांच्या इमारतीची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.