Breaking News

दखल - पूनमताईंचं महनीय चिंतन!

मोठ्या माणसाच्या घरात जन्माला आलेली मुलं त्या माणसाचा विचार पुढं घेऊन जात असतात, असं म्हणतात. प्रमोद महाजन यांचा देशात दरारा होता. त्यांची भाषणं विरोधकही ऐकत. प्रमोद महाजन याचं हिंदी, मराठी, इंग्रजी आदी भाषांवर प्रभुत्त्व होतं. त्यांच्या वक्तृत्त्वाची मोहिनी देशावर होती. कितीही वेगात बोलले, तरी त्यांच्याकडून चुकूनही अपशब्द जात नसे. त्यांना खुलासे कधीच करावे लागत नसतं. त्यांची मुलगी पूनम यांच्याकडून तशाच अपेक्षा ठेवल्या, तर काही गैर मानता येणार नाही. महाजन यांचं पक्षात जे स्थान होतं, त्यांचं योगदान होतं, ते लक्षात घेऊन भाजपनं पूनम यांना युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं. मुंबईचं खासदार केलं. त्यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी सोपविली. अशा पार्श्‍वभूमीवर त्यांचं वागणं अतिशय पोक्त आणि उत्तरदायित्त्वाचं असलं पाहिजे, अशी अपेक्षा बाळगली, तर त्यात वावगं काही नाही; परंतु पूनम महाजन यांनी मात्र एकामागून एक वादग्रस्त वक्तव्य सुरू केलं आहे. 

पहिल्या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर तरी त्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा होता; परंतु पूनमताईंना आपल्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील आणि त्याची किंमत आपल्यापेक्षा पक्षाला मोजावी लागेल, याचं भान राहिलेलं नाही. भाजपचा विजयाचा वारू सर्वत्र उधळत असताना त्यांच्या नेत्यांचं उन्मादी वागणंही वाढत चाललं आहे. 
नाशिकहून शेतकर्‍यांचा मोर्चा मुंबईत आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पद्धतीनं विचार करून शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या. गिरीश महाजन यांची त्यातली भूमिका महत्त्वाची ठरली. शिवसेनेसह विरोधकांचा दबाव तसंच राज्य विधिमंडळाचं चालू असलेलं अधिवेशन लक्षात घेऊन सरकारनं या मागण्या मान्य केल्या. एकीकडं सरकार अशी सकारात्मक भूमिका घेत असताना दुसरीकडं त्यांच्याच पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांनी मात्र मोर्चेकरी शेतकर्‍यांची संभावना नक्षलवाद्यांत करून एक नवा वाद ओढवून घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामागं माओवादी हात आहे का, याचा शोध घेतला पाहिजे, असे म्हणत त्यांनी आंदोलनाला नक्षली चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला. या शेतकर्‍यांच्या हाती लाल झेंडे असून ते कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहेत. 

आंदोलन शांत पद्धतीनं होत आहे; पण यामागे नक्षली आहेत का, याचा शोध घेतला पाहिजे, असं त्या म्हणाल्या. पूनम महाजन यांनी यापूवीर्ही पुण्यात साहित्यिक आणि कलाकारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारचं नाव न घेता ‘राजा तुझं चुकलंच’, असा उल्लेख आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता. तोच धागा पकडून महाजन यांनी साहित्यिक आणि कलाकरांनी राजकारणाविषयी फालतू भाष्य करू नये, असा नाहक सल्ला दिला होता. विचारांना एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कला आणि साहित्य आवश्यक असतं. लोकशाहीमध्ये राजकीय भाष्य करण्याचं स्वातंत्र्य आहे; परंतु कलाकार आणि साहित्यिकांकडून सकारात्मकतेची अपेक्षा आहे. कला, साहित्याबाबत कलाकार आणि साहित्यिकांनी जरूर सूचना कराव्यात. मात्र, ‘राजा काय करतो, प्रजा काय करते यावर कलाकार, साहित्यिकांनी फालतू भाष्य करू नये,’ असा सल्ला पूनम महाजन यांनी देशमुख यांचं नाव न घेता दिला होता. व्यक्तिस्वातंत्र्यांचा, भाषणस्वातंत्र्यांचा एकीकडं सर्वोच्च न्यायालय पुरस्कार करीत असताना राज्यकर्ते आता साहित्यिकांनाही काय लिहावं, काय बोलावं, याचे सल्ले द्यायला लागले आहेत. साहित्यिक आपल्या ताटाखालची मांजरं बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पूनम महाजन त्याला अपवाद नाहीत. 

एवढया लहान वयात पूनम यांनी असामान्य व प्रगाढ विद्वत्ता प्राप्त केली आहे. त्या निवडून आल्या यातूनच त्यांच्या पांडित्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. महाराष्ट्रात यापूर्वी ‘क लेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ असे वाड्ःमयीन वाद घडले. अत्रे, फडके, खांडेकर, कुरुंदकर अशा अनेकांनी त्यावर काहीबाही लिहूनही ठेवले; परंतु एकतर यातील क ोणीही खासदार वगैरे नसल्यामुळं त्यांचं आकलनच कमी पडलं. त्यांना जे कळलं नाही, ते पूनम महाजन यांना कळलं. साहित्यिकांचं प्रयोजन असतं, ते केवळ सकारात्मक गोडगोड साहित्य लिहिण्याचं. त्यांनी राजा काय करतो, प्रजा काय करते यावर फालतू भाष्य करायचे नसतं. केवढा हा सुविचार पूनमताईंनी मांडला! साहित्यिकांनी गुपचूप लिहावे. लोकांना सकारात्मक हसवावे. आम्हाला मतदान करावे. पुरस्कार वगैरे घ्यावेत आणि गप्प बसावे. साहित्य आणि जीवन यांत संबंध कशाला ठेवावा, असा सल्लाच त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला. एकीकडं पूनमताईंनी सल्ला दिला असताना खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी आणखी एक नवा विचार मांडला आहे! राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वांधिक फ ायदा सोनिया गांधी यांना झाला, अशी अक्कल त्यांनी पाजळली आहे. स्वामी यांचा सोनियाविरोध सर्वज्ञात आहे. त्यांनी यापूर्वी ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी राहुल व सोनिया गांधी यांच्याविरोधात न्यायालयीन लढा दिला आहे. वडिलांच्या मारेकर्‍यांची प्रियंका गांधी घेतलेल्या भेटीवरही स्वामींनी टीका केली होती. तुरुंगात फक्त नातेवाइकांना कैद्याशी भेटू दिले जाते. त्या कोणाच्या नातेवाईक आहेत? सोनिया गांधींनी नलिनीच्या मुलीचा इंग्लंडमधील शिक्षणाचा सर्व खर्च उचलला आहे. त्यांच्यावर एवढी दया का दाखवली जात आहे? राहुल गांधी यांनी आपण व बहीण प्रियंका गांधी यांनी वडीलांच्या मारेकर्‍यांना माफ केल्याचं म्हटलं होतं.