Breaking News

विजया रहाटकर राज्यसभेच्या रिंगणात राज्यसभेसाठी भाजपकडून चौथा उमेदवार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने चौथा उमेदवार सोमवारी दिल्यामुळे निवडणूका बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे. भाजपतर्फे विजया रहाटकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. विजया रहाटकर या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या प्रमुखही आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबादचे महापौरपदही भूषवले आहे. भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची नावं जाहीर केली होती. त्यातच सोमवारी विजया रहाटकरांना भाजपने राज्यसभेच्या मैदानात उतरवले. त्यामुळे अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे.

महाराष्ट्रातून शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून कुमार केतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 13 मार्च रोजी निवडणूक अर्जाची छाननी होणार असून 15 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 16 राज्यातील राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. विधानसभेचे संख्याबळ पाहता, राज्यातील तीन जागांवर भाजपचा विजय निश्‍चित मानला जातो.