Breaking News

कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीने टाकले ‘एक पाऊल स्वच्छतेकडे!’


राहूरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत येणाऱ्या निधीतून ग्रामपंचायतीने विविध भागांत स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये भोसले नगर, जिजाऊ नगर, गावठाण हद्द, भाऊसाहेब नगर आदी परिसरात कचरा कुंड्या ठेवून गावातील हा परिसर शंभर टक्के स्वच्छतामय केला आहे. लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांनी कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीला ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ टाकण्यासाठी भाग पाडल्याचे यानिमित्ताने जाणवत आहे. 

कोल्हार खुर्द गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन अवघे तीन महिने झाले आहेत. पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणून उच्चशिक्षित आणि समाजपरिवर्तनास नेहमी प्राधान्य देणारे प्रकाश पाटील यांच्यामुळे या गावच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला. यामुळे कोल्हारकरांना गावासाठी योग्य असा सरपंच मिळाला असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या सरपंचांनीदेखील ग्रामविकासाच्यादृष्टीने लगेचच पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. 

ग्रामविकासाच्यादृष्टीने सरपंचपदी विराजमान झालेल्या प्रकाश पाटलांनी वेळेचा विलंब न करता १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत स्वच्छतेसाठी आलेल्या निधीचे योग्य नियोजन करत गावठाण हद्द, भोसले नगर, जिजाऊ नगर अशा विविध परिसरात जवळपास सात कचराकुंड्या ठेवल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांना सर्व प्रकारचा कचराकचरा कुंडीतच टाकण्याचे आव्हान करण्यात आले आहे. नगर मनमाड राज्यमार्गाच्या भुयारीमार्गाचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्नदेखील त्यांनी अगदी योग्य पद्धतीने हाताळत भुयारी मार्ग सुरळीत सुरु केला. या ठिकाणावर असलेली अस्वच्छता पूर्णपणे निकाली काढत शाळकरी विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न निकाली काढला. या परिसरात कचरा टाकणार्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईचे फर्मान सुनावत स्वच्छतेसाठी कठोर पावले उचलली आहेत. कचराकुंड्यादेखील भरण्यापूर्वीच साफ करण्याची ताकीद त्यांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावात स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असलेले स्थानिक ग्रामस्थ लोकनियुक्त सरपंचांना धन्यवाद देत आहेत. 

ग्रामस्वच्छता अभियानाच्यादृष्टीने प्रयत्न
आतापर्यंत गावात ७ कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत. गावठाण आणि पाटीलवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांसाठी तयार करण्यात आलेले सार्वजनिक शौचालये दयनीय झाली आहेत. पाटीलवाडी रस्त्याच्या बाजूला बंदिस्त गटारीचे काम रखडलेले आहे. त्याचप्रमाणे भाऊसाहेबनगर परिसरातदेखील बरेच रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. ही कामेदेखील लवकरच मार्गी लावून ग्रामस्वच्छता अभियानाच्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.