Breaking News

परिचारकांच्या बडतर्फीसाठी विधानसभेत खडाजंगी


मुंबई : भारतीय सैनिकांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत परिचारकांबाबत विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधीपक्ष सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. प रिचारकांचे निलंबन मागे घेण्याचा अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत त्यांना सभागृहातही बसू देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सभापतींनी यावर योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना सरकारला दिल्या. तसेच परिचारक यांना सभागृहात बसू न देण्याचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी निर्देशही दिले. प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याचा दुसरा ठराव आज शिवसेनेचे अनिल परब यांनी मांडला. परब यांनी पूर्वीचा आणि आज मांडण्यात आलेला ठराव आणि त्यासाठी राज्यघटनेत असलेली तरतूद लक्षात घेता हा ठराव मान्य होऊ शकत नाही, अशी बाब सभापतींनी सभागृहात निदर्शनास आणून दिली. हा ठराव सभागृह नेत्यांकडून आणला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबत सभागृहातील सदस्य आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्यासाठी अंतिम निर्णय घेणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. दरम्यान, या सभागृहात परिचारक यांनी पाऊल ठेवू नये, अशी मागणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप, सेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे जयवंतराव जाधव आदींनी केली. आमदार परिचारकांच्या निलंबनाबाबतच्या सभागृह आणि त्यातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यासाठीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिले. अनिल परब यांनी मांडलेल्या ठरवाला पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांनी स्पष्ट केले.