Breaking News

दखल - उन्मादी भाजप

राजकीय पक्षांच्या आयुष्यात हार-जीत ठरलेली असते. पराभवानं खचून जायचं नसतं, तसंच विजयानं हुरळून जायचं नसतं. हे तत्वज्ञान झालं. कोणताही विजय हा विनयानं घ्यायचा असतो, उन्मादानं नव्हे; परंतु इतरांपेक्षा वेगळा असल्याची बतावणी करणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांना विजयानं उन्माद चढला आहे. त्रिपुरात डाव्या-उजव्यांत कमालीचा संघर्ष होता. डाव्यांची दंडेलशाही होती, म्हणून तर जनतेनं त्यांना नाकारून भाजपला संधी दिली. जनतेनं टाकलेला विश्‍वास कामातून सार्थ करून दाखविण्याऐवजी भाजपच्या क ार्यकर्त्यांनी उन्मादाचा मार्ग अवलंबला. 

रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा त्रिपुरातील पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत विजयी उन्मादात तोडला. एरव्ही संभाजी ब्रिगेडवर पुतळे तोडल्याचा आरोप करताना भाजपचे कथित लोक पुतळे तोडून विचार मरत नसतात, असा कांगावा करायचे. आता लेनिनच्या पुतळ्याची विटंबना करून त्यांचे विचार हद्दपार होतील, असं त्यांना वाटत असेल, तर ते मूर्खांच्या आनंदवनात वावरत आहेत, असं म्हणावं लागेल. दक्षिण त्रिपुरामधील बेलोनिया शहरातील कॉलेज चौकात गेल्या पाच वर्षांपासून हा पुतळा होता. पुतळा तोडण्यासाठी जेसीबीही आणण्यात आला होता. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत गेली 25 वर्षे सत्तेत असलेल्या डाव्यांचा भाजपनं पराभव के ला. डाव्यांना हरवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यात वावगं काहीच नाही; परंतु जल्लोष साजरा करताना भान सोडून विजयाच्या उन्मादात या कार्यकर्त्यांनी  लेनिनच्या पुतळ्यावर बुलडोझर फिरवला आहे; मात्र हा पुतळा डाव्यांच्या सत्तेला त्रासलेल्या लोकांनी हटवल्याचा दावा भाजपनं केला असला, तरी त्यावर कुणी विश्‍वास ठेवणार नाही. केवळ पुतळा उखडूनच कार्यकर्ते थांबले नाहीत. हा पुतळा खाली उतरवल्यानंतर पुतळ्याचं शीर धडापासून वेगळं करण्यात आले आणि भाजप कार्यकर्ते लेनिनच्या धडावेगळ्या शीरानं फुटबॉल खेळत होते. हा विकृतीचा कळस म्हणायला हवा. जेसीबी यंत्राचा चालक आशिष पाल याला नंतर अटक करण्यात आली; मात्र तो लगेच जामिनावर सुटला. 
स्थानिक शिल्पकार कृष्णा देबनाथ यांनी सुमारे तीन लाख रुपये किंमतीचं हे शिल्प तयार केलं होतं. 2013 मध्ये त्रिपुरातल्या डाव्यांच्या सरकारला 21 वर्षे पूर्ण झाल्याच्या नि मित्तानं हा पुतळा इथं बसवण्यात आला होता. पश्‍चिम बंगालमधील डाव्यांची 34 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात तृणमूल काँगे्रसला यश आलं. लोकांचा पाठींबा या पक्षाला मिळाला; परंतु सत्तेवर आल्यानंतर तृणमूल काँगे्रसचे कार्यकर्तेही डाव्यांसारखेच वागायला लागले. धुडगूस घालायला लागले. त्यामुळं डाव्यांत व तृणमूल काँगे्रसच्या कार्यकर्त्यांत जसे आवडायला निवडायला कुणी राहिले नाही, तसे आता त्रिपुरात डाव्या-उजव्यांचं झालं आहे. अर्थात असं असलं, तरी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पश्‍चिम बंगालमधील लेनिनच्या पुतळ्याला हात लावलेला नाही. एखाद्यानं चुकीचं केलं म्हणजे दुसर्‍यानंही तसंच केलं पाहिजे असं नाही. उलट, आपल्या वागणुकीतून वेगळेपण दाखविण्याची संधी भाजपच्या क ार्यकर्त्यांना आली होती. पुतळा तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून पुतळा पाडताना भाजप कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचं दिसतं. राज्याच्या अन्य भागांमध्येही हिंसाचाराच्या घटना सुरू झाल्यानं सत्ता स्थापनेपूर्वीच पक्षासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. 
व्लादिमिर इलिच लेनिन (इस.1870-1924) हे रशियाचे क्रांतिकारी नेते व विचारवंत होते. भांडवलशाहीला विरोध आणि कामगारांचं राज्य या दोन संकल्पनाभोवती त्यांचं काम केंद्रीत झालं होतं. रशियापुरतं त्यांचं व्यक्तिमत्त्व मर्यादित राहिलं नाही. दोनदा रशिया सोडावा लागूनही त्यांनी तिथं क्रांती घडवून आणली. पहिल्या महायुद्धातून योग्य वेळी माघार घ्यायला लावून रशियाचं नुकसान टाळलं. कायदा, तत्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या, मार्क्सवाद अशा विविध विषयांवर चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैली यामुळं लेनिन समाजवादी गटाचे प्रमुख कार्यकर्ता बनले. 1917 साली समाजवाद्यांनी 24-25 ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली, त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते. मार्क्सनं शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिननं त्यास मूर्त स्वरूप दिलं. अशा लेनिन यांचे पुतळे उखडून त्यांचे विचार संपविता येत नाहीत, याचं न ठेवता उलट खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपली अक्कल पाजळली पाहिजे. लेनिन विदेशी होते, एकाप्रकारे ते दहशतवादीच होते. अशा व्यक्तींच्या पुतळ्यांची आपल्या देशात काय गरज आहे, असा सवाल करीत कम्युनिस्ट पक्षांना हवं असेल, तर त्यांनी तो पुतळा त्यांच्या कार्यालयात बसवावा आणि त्याची पूजा करावी, असा अनाहूत सल्ला त्यांनी दिला आहे. तिकडं नागालँडमध्ये विजय मिळविल्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचा आमदार नोटा उधळत असल्याचं वाहिन्यांवर पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील आमदारही कमी नाहीत. सध्या विधानसभाचं अधिवेशन सुरू असताना आर्णी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू तोडसाम मात्र ढेमसा नृत्यात तल्लीन झाले आहेत. आर्णी विधानसभा मतदारसंघातील अंजनखेड या गावी स्व. निर्मलाबाई गणपत मडावी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ ढेमसा नृत्यं आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेत ग्रामीण भागातील अनेक चमू सहभागी झाले होते. या वेळी ढेमसा नृत्य सादर करण्यात आलं, तेव्हा आमदार तोडसाम हे सुद्धा चांगलेच फार्मात आले आणि त्यांनी एका महिलेसोबत ठेका धरायला सुरुवात केली. बराच वेळ नाचल्यानंतर तोडसाम थकले. सध्या ग्रामीण भागातील जनता विविध समस्यांनी त्रस्त आहेत; मात्र आमदार तोडसाम यांना त्या जाणून घ्यायला वेळ दिसत नाही. 
उमरेडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर पारवे यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण केल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पारवे यांना मारहाण प्रकरणात भिवापूर न्यायालयानं यापूर्वी शिक्षा ठोठावली होती. त्यामुळं त्यांचं विधानसभा सदस्यत्व अडचणीत आलं होतं. या घटनेसंदर्भात संबंधित पोलिस अधिकारी आणि आमदार यांनी परस्परांच्या विरोधात उमरेड पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या. मात्र, या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक अनिल गर्जे र विवारी पत्नीसह त्यांच्या कारनं गिरड इथं दर्शनासाठी गेले होते. तिथून परत येत असताना मांगरुड मार्गावर त्यांची कार पंक्चर झाली. चाक दुरुस्तीसाठी ते घेऊन जात असताना त्याच मार्गानं रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उमरेड मार्गानं पारवे नागपूरला कारनं येत होते. गर्जे यांच्या गाडीचं चाक पारवे यांच्या गाडीवर येऊन धडकलं. त्यामुळं पारवे आणि त्यांचे स्वीय सचिव संतप्त झाले. यातून गर्जे आणि पारवे यांच्यात वाद झाला. गर्जे यांनी सुरुवातीला पारवे यांच्या कार्यकर्त्याला आणि स्वीय सहायकाला मारहाण केली. त्यामुळं संतापलेल्या पारवे यांनी शिवीगाळ करत गर्जे यांना मारहाण केली. यात पोलिसाचे कपडे फाटले. लगेच गर्जे आणि कुटुंबीयांनी उमरेड पोलिस ठाणं गाठलं आणि पारवे यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पारवे यांच्या स्वीय सहायकानं गर्जे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पारवे यांनी मारहाण करण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी त्यांनी एका शिक्षकाला मारहाण केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. आता पोलिस मारहाणीचे प्रकरण समोर आलं आहे.