Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी


राहुरी ता. प्रतिनिधी  - तालुक्यातील कणगर शिवारात बिबट्याने एका इसमावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमास राहुरीच्या दवाखान्यात आणले असता याठिकाणी तपासणी करुन अधिक उपचारासाठी नगरला हलविण्यात आले.

आज {दि. २०} सकाळी साधारण ११ ते ११.३० च्या दरम्यान माधव सिताराम बर्डे {रा. कणगर} हे शेतात कामावर जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. या झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार करताना माधव बर्डे हे गंभीर जखमी झाले. आरडाओरड झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी बर्डे यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला. हल्ल्यानंतर बिबट्याने डोंगराच्या बाजूने धूम ठोकली. 

उन्हाळा सुरु झाल्याने डोंगराळ भागात पाणवठे व हिरवाई नष्ट होत आहे. त्यामुळे बिबट्यांचा लोकवस्तीकडे वावर वाढत चालला आहे. शेतात कामास जाणारे शेतमजूर व महिला तसेच या भागातील शाळकरी मुलांची सुरक्षितता धोक्यात सापडू नये, याकरिता वनविभागाने काळजी घेऊन बिबट्यांचा वावर असलेल्या भागांत पिंजरे लावून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.