Breaking News

उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांची भूमिका


राहुरी ता. प्रतिनिधी - सन २०११ पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. या कामी कृषि विज्ञान केंद्रांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले. राहुरी विद्यापीठात आयोजित आलेल्या कृषि विज्ञान केंद्रांच्या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पुण्याच्या अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, हैद्राबादच्या अटारीचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजिंदर रेड्डी आदी उपस्थित होते. 

कुलगुरु डॉ. विश्वनाथा म्हणाले की, दुग्ध व्यवसाय हे एकात्मिक शेती पध्दतीचे मुलभूत अंग आहे. त्याद्वारे शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न मिळत आहे. याशिवाय कृषि विज्ञान केंद्रांनी शेतकर्यांना कुक्कुटपालन, मत्स्यशेती, मधुमक्षीकापालन यासारख्या कृषि आधारित व्यवसायांवर मार्गदर्शन करावे. सेंद्रिय खतांचा वापर वाढवून गांडूळ खते तसेच जैविक खतांचा वापर करुन शेतकर्यांनी पीक लागवडीचा खर्च कमी करण्यावर भर द्यावा. कृषि विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्यांच्या समस्यांवर अभ्यास करुन पीक पध्दतीचे नियोजन करावे.

प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी धुळे कृषि विज्ञान केंद्राने तयार केलेल्या भेंडीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापन या घडी पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे १२४ शास्त्रज्ञ तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते. डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले.