Breaking News

सुसंस्कार ही आनंदाची गुरूकिल्ली - प्रा. वसंत हंकारे

आयुष्यात संपत्ती पेक्षा संततीवर प्रेम करा. संस्काराला महत्व द्या कारण चांगले संस्कार ही आनंदी जगण्याची गुरुकिल्ली आहे. असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी केले.


कर्जत येथील श्री. सिद्धिविनायक पतसंस्थेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त बाजारतळ येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यप्रसंगी प्रा. हंकारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप अ‍ॅड. नवनाथ कदम हे होते. यावेळी कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार लांगोरे, उपाध्यक्ष वसंत मेहेत्रे, संचालक लक्ष्मण हिंगसे, दिलीप भोज, राजेंद्र बारटक्के, सतीष पवार, राहुल राऊत, अतुल कुलथे, नितिन देशमुख, व्यवस्थापक संतोष राऊत यांचेसह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. हंकारे यांनी आज समाजात गाडी, बंगला, शेती, पैसा कमविन्याच्या मागे धावत मुलांवर संस्कार करायचे राहुन जाते. शेवटी वृद्धाश्रम हेच ठिकाण राहते. यासाठी पैसा आणि संपत्तीच्या मागे न धावता घरात मुलांवर योग्य संस्कार करा, याची प्रचिती आनंदी आणि समाधानी जगण्यात येईल. आज धावत्या जीवनशैलीने आम्हाला नाटकी केले आहे. चेहर्‍यावर खोटे हास्य आणून आनंदी आभास निर्माण करण्यापेक्षा मनापासून आनंदी आणि समाधानी जगण्याला महत्व दया. याने तुमचे शरीर आणि मन प्रफुल्लित राहील, तुम्ही नेहमी आनंदी जगाल असे प्रा. हंकारे म्हणाले.