पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या आश्वासनानंतर टाळे ठोको आंदोलन मागे
नेवासा , भीमा-कोरेगावच्या घटनेतील आरोपी भिडे गुरुजींना अद्याप अटक झाली नसून त्यांना पाठीशी घालणार्या सरकार निषेध करत लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष संजय सुखधान यांनी नेवासा बसस्थानक समोरील भाजप कार्यालयास टाळे ठोको आंदोलन पोलीस प्रशासन व आमदार मुरकुटे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमून काही आरोपींची नावे घेतली त्यात भिडे गुरुजीचे नाव निष्पन्न झाले असून तीन महिने उलटले तरी त्यांना अद्याप ही अटक झालेली नाही. भाजप सरकार त्यांना पाठिशी घालत आहे, जर घटनेत संबंध नसेल तर स्वत: भिडे यांनी चौकशीला सामोरे जाणे गरजेचे होते. परंतु केवळ जातीय तेढ व देशामध्ये दंगली घडविण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो .भिडे गुरुजींना अद्याप अटक न झाल्याने 24 मार्च रोजी नेवासा शहरातील भाजपचे कार्यालय बंद करू व टाळे ठोकू असा इशारा संजय सुखधान यांनी दिला होता.
शनिवारी सकाळी सुखधान यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन घोषणाबाजी करत शहरातून फेरी मारली व टाळे ठोको आंदोलनासाठी नेवासा बसस्थानक जवळील आमदार कार्यालयाजवळ आले असता भिडे गुरुजींना वेगळा कायदा का? भाजप कार्यालयास किती दिवस बंदोबस्त देणार ? आशा प्रश्नाबरोबर भारत माता की जय, भाजप सरकारचा जाहीर निषेध अशी घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी त्यांना कार्यालयासमोरच अडवले असता त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आमदार बाळासाहेब मुरकूटे व सुखधान यांच्यात झालेल्या चर्चेत आमदार मुरकुटे म्हणाले की या प्रश्नावर दोन्ही सदनात चर्चा सुरू असून यावर लक्षवेधी ही झाल्या आहेत. आमचा आंदोलन करण्यास विरोध नाही मात्र भाजप कार्यालयास टाळे ठोकणे योग्य नसून हा प्रश्न अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर एक तास चाललेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते ही उपस्थित होते.