Breaking News

बीडीडी चाळ अपहारप्रकरणी वरळीत गुन्हा दाखल कार्यकारी अभियंता पाटीलसह पंधरा संशयीतांवर चोवीस कोटी भ्रष्टाचाराचा आरोप

मुंबई/ विशेष प्रतिनिधी - मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील वरळी उपविभागांतर्गत बीडीडी चाळ देखभाल दुरूस्तीत झालेला 24 कोटींचा अपहार पोलीस ठाण्यात पोहचला असून अधिक्षक अ भियंता अरविंद सुर्यवंशी यांनी सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांच्यासह अपहाराशी संबंधीत बारा ते पंधरा जणांविरूध्द वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तुमसरचे भाजपा आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केलेल्या तक्रारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर शासनाने काढलेल्या आदेशपत्रावरून अधिक्षक अभियंत्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली असून अन्य चर्चेत असलेल्या अपहार प्रकरणाशी संबंधित अभियंत्यांचे धाबे दणाणले आहे.मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील वरळीच्या बीडीडी चाळ देखभाल दुरूस्तीच्या कामात अनाधिकाराने काम करून चोवीस कोटी रूपयांचा अपहार झाल्याची माहीती सामाजिक कार्यकर्त्यांनी आ. चरणभाऊ वाघमारे यांना दिली होती. या माहीतीचा अभ्यास केल्यानंतर आ, चरणभाऊ वाघमारे यांनी 25 मार्च 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तक्रार करून चौकशी करण्याची विनंती केली होती. या तक्रार अर्जाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले. प्रधान सचिवांच्या आदेशावरून कक्ष अधिकारी अ. पा. मोहीते यांनी धनंजय चामलवार अधिक्षक अभियंता दक्षता पथक मुंबई साबां यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश 5 एप्रिल 2017 रोजी जारी केले. कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांनी स्वतःच्या अधिकारात 2059 किरकोळ दुरूस्ती या लेखाशिर्षाखाली बोगस कार्यक्रम मंजूर केला, पाटील यांनी जुनी कोट्यावधी रूपयांची अनेक कंत्राटदारांची देयके प्रलंबीत ठेवून बोगस कार्यक्रम तयार करून एकाच आठवड्यात बोगस कंत्राटदारांना अदा केल्याची तक्रार आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केली असून आगामी काळात आणखी बरीच देयके अदा करण्याची तयारी सुरू आहे.आ. वाघमारे यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करावा, असे या आदेशात म्हटले आहे.
या आदेशावर सखोल चौकशी करून धनंजय चामलवार यांनी अहवाल सादर केला या अहवालात कुठल्या कामात काय गोंधळ केला, कुणी केला, कुणी एमबी नोंद केली, देयक ाला मंजूरी कुणी दिली, कुठल्या कंत्राटदाराला किती अतिरिक्त देयके दिली अशा अपहाराचा तक्ताच अहवालासोबत सादर केला. या अहवाल तक्त्यावरून वरळी पोलीस ठाण्यात अवर सचिव गो. भ. शिंदे यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश 6 फेब्रूवारी 2018 रोजी दिले. या आदेशावरून सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील व अन्य संबधित अ धिकारी, कर्मचारी, कंत्राटदार अशा दहा ते पंधरा जणांविरूद्ध अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी आज सायंकाळी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रक रणाने साबां वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चेतील अपहाराशी संबंधित अभियंत्यांची पळता भुई थोडी झाली आहे. (क्रमशः)