Breaking News

शुक्रवारपासून अहमदनगरमध्ये कृषी महोत्सव, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार उदघाटन


कृषी क्षेत्रातील बदलत्या परीस्थितीत शेतकर्‍यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. प्रयोगशील व प्रगतशील शेतकर्‍यांच्या माध्यमातून व विविध नवनवीन संकल्पना, कृषी विषयक तंत्रज्ञान शेतकर्‍यांना उपलब्ध करुन दिल्यास त्याचा फायदा शेतकर्‍यांना त्यांचे दैनंदिन शेती व्यवसायामध्ये होणार आहे. शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध कृषी विषयक योजना, उपक्रमांची माहिती अद्यायावत कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकर्‍यांचे अनुभव कृषीपूरक व्यवसाय, बाजार व्यवस्थापन आदी मार्गदर्शन उलपब्ध व्हावे, या दृष्टीकोनातून जिल्हास्तरावर दि. 30 मार्च ते 3 एप्रिल 2018 या कालावधीत तांबटकरमळा, पारीजात चौक, सावेडी अहमदनगर या ठिकाणी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, धान्य, फळे, भाजीपाला महोत्सव शेतकर्‍यांसाठी शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन व परीसंवाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवासाठी 215 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे.
 
कृषी महोत्सवामध्ये भरविण्यात येणार्‍या प्रदर्शनामध्ये विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजना उपक्रम शेतकरी व शहरातील नागरीक होण्यासाठी सर्व विभागांचे स्टॉल उभारले जाणार आहे. यासाठी 30 स्टॉल्स आरक्षित केले आहेत. कृषी विषयक नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांना अवगत होण्याच्या दृष्टीने कृषी तंत्रज्ञान विषयक स्टॉलची उभारणी या प्रदर्शनामध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी लागणारी औजारे, खते, बी-बीयाणे, हरीतगृह साहित्य, तूषार व ठिबक सिंचन अपारंपारीक उर्जा, टिश्यू कल्चर, बायोफर्टिलायझर, कृषी साहित्य व नियतकालिके शेतमाल साठवणूक तंत्रज्ञान आदींचे 60 स्टॉल्स उपलबध करुन दिलेले आहेत. ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित औजारांसाठी 15 स्टॉल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. तर खाद्य महोत्सवासाठी 15 स्टॉल्स ठेवण्यात आले आहेत.

या महोत्सवामध्ये शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी व शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री साखळी निर्माण व्हावी. या संकल्पनेतून धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्हयातील सेंद्रिय गटांच्या माध्यमातून उत्पादीत झालेले विषमुक्त आरोग्यदायी अन्नधान्य, कडधान्य, डाळी फळे, भाजीपाला व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून स्वच्छता व प्रतवारी केलेला शेतमाल मोठया प्रमाणावर शहरातील ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.