निमगाव पागा येथे सात दुकाने फोडली
तालुक्यातील निमगाव पागा गावात एकाच रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी एकूण ७ दुकाने फोडून लाखोंच्या मुद्देमालासह रोकड चोरल्याची घटना घडली. आज {दि. १४} सकाळी या सर्व दुकानांचे मालक संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गेले. यासंदर्भात पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. गावातील सोमनाथ कृषी सेवा केंद्र, कालिका माता कृषी सेवा केंद्र, अमीन मोबाईल शॉपी, घुले मेडिकल, बाबा मेडिकल, साईश्रद्धा किराणा, समर्थ सुपर शॉपी अशी या दुकानांत घरफोडी झाली.
चोरट्यांनी या सर्व दुकानांचे शटर्स टॉमीच्या साहाय्याने तोडून रोख रक्कम, चिल्लर व किरकोळ सामानावर ‘हाथ साफ’ केला. दरम्यान, चोरटे एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. एकूण किती मुद्देमाल चोरीस गेला आहे, याचा तपास पोलीस करत आहे. तसेच संध्याकाळी साडेपाच वाजता नगरहून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यातील दुकानमालक भागवत सयाजी कानवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.