Breaking News

मरीआई कॉम्प्लेक्समध्ये आढळली संशयास्पद बॅग

सातारा - सातारा शहरातील पोवई नाक्यावरील गजबजलेल्या मरीआई कॉम्प्लेक्स येथे बेवारस बॅग सापडली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकासह श्‍वान पथकाने घटनास्थळाची पाहणी करत संशयास्पद बॅग ताब्यात घेतली. मात्र, या बॅगमध्ये कपडे असल्याचे समोर आले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीच राबवलेले हे मॉकड्रिल असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 


सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सुरक्षेच्या कारणास्तव व आपत्कालीन वेळेत पोलीस दलातील विविध घटक किती जागृत आहे हे पाहण्यासाठी मॉकड्रिल राबवले. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मरीआई कॉम्प्लेक्स येथे बेवारस व संशयास्पद बॅग असल्याचा फोन पोलिसांना गेला. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत बॉम्बशोधक पथक, श्‍वान पथक व पोलिसांचा फौजफाटा परिसरात पोहचला. मरीआई कॉम्प्लेक्सला पोलिसांनी वेढल्यानंतर वाहन चालकांसह परिसरात बघ्यांची गर्दी वाढली.