Breaking News

उन्हाळी हंगामासाठी उजनीतून दोन आवर्तने, 15 पासून कालव्यात पाणी

सोलापूर - उजनी धरणातून उन्हाळी हंगामासाठी कालवा, भीमा, सीना नदी आणि सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी प्रत्येकी दोन आवर्तन सोडण्याचे मुंबई येथे मंत्रालयात उजनी पाणी नियोजन बैठकीत ठरले. त्यानुसार 9 मार्चपासून बोगद्यातून सीना नदीत आणि 15 मार्चपासून उजनी कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे. महापालिकेच्या मागणीनुसार सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव सी. एस. बिराजदार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. 


नियोजनानुसार 9 मार्चपासून भीमा - सीना जोडकालव्यामधून सीना नदीत, 15 मार्चपासून उजनीच्या मुख्य कालव्यातून पहिले आवर्तन सुरू होईल. सीना माढा उपसा सिंचन योजनेद्वारे दोन पाळ्या देण्यात येणार आहेत. पहिले आवर्तन सुरू झाल्यानंतर 20 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर 15 मे दरम्यान प्रत्येक ठिकाणी दुसरे आवर्तन सुरू होणार आहे. कालवा व सीना नदीतून प्रत्येक आवर्तन 30 ते 35 दिवसाचे किंवा मागणीनुसार राहणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले. उन्हाळी हंगामासाठी उजनीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचे वेळेत योग्य नियोजन झाल्याने शेतीसाठी पाणी मिळणार आहे. भीमा सीना बोगद्यातून 900 क्युसेक्सने सीना नदीत पाणी सोडले जाईल. आवर्तन बंद झाल्यानंतर पुन्हा बोगद्यातून 150 क्युसेक्स पाणी 20 दिवस प्रवाहित ठेवण्याची मागणी आमदार शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली. त्याला तत्वत: मान्यता मिळाली. माळशिरस तालुक्यातील घुमेरा ओढ्यात दोनवेळा पाणी सोडण्याची आमदार डोळस यांचीही मागणी मान्य करण्यात आली.