Breaking News

येसवडी कुकडी चारीच्या टेलला पाण्याची बोंब

कर्जत तालुक्यातील येसवडी कुकडी चारीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोमवारी दुपारी सुटले. मात्र आवर्तन कमी दाबाने सुरु असल्याने ते टेलच्या येसवडी, करमनवाडी भागात पोहोचले नाही. या चारीवरील शेतकर्‍यांनी बुधवारी सकाळी 9 वा. धुमकाई फाटा येथे येवून बैठक घेवून याबाबतचे निवेदन तयार केले. कुकडी चारी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष शशिकांत लिहिणे यांनी अभियंता साठे यांना संपर्क करुन पाण्याबाबत विचारणा केली. मात्र पाणी बंद झाल्याचे सांगण्यात आल्याने समितीकडून निवेदन देवून कायदेशीर लढाई केली जाईल असे लिहिणे यांनी सांगितले.

या चारीवरील धालवडी, तळवडी, बारडगाव दगडी या भागात मंगळवारी पाणी आले. मात्र पाणी कमी दाबाने व अधूनमधुन बंद होत असल्याने तेथेही पिकांना पुरेसे पाणी देता आले नाही. टेल टू हेड पाणी देण्याच्या पध्दतीला अधिकार्‍यांकडून हरताळ फासला जात असल्याची प्रतिक्रिया संघर्ष समितीचे सचिव बंडू सुपेकर यांनी दिली. या बैठकीसाठी बापूराव सुपेकर, मोहन सुपेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. प्रा. अशोक पावणे यांनी संघर्ष केल्याशिवाय पाणी मिळत नसेल तर आंदोलन करावेच लागेल.सोबत कायदेशीर पध्दतीने लढा देवून हक्काचे पाणी मिळवू असे सांगितले.दरम्यान पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांनीही धुमकाई फाटा येथे येवून शेतकर्‍यांशी चर्चा केली.