Breaking News

आयपीएल 9 : सनरायझर्स हैदराबादला विजेतेपद

बंगळुरू, दि. 31 -  फलंदाजांनी केलेल्या तुफानी हल्ल्यानंतर गोलंदाजांच्या अप्रतिम मार्‍याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या नवव्या सत्राचे  दिमाखात विजेतेपद पटकावताना बलाढ्य रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 8 धावांनी लोळवले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून 208 धावा उभारल्यानंतर बँगलोरला  200 धावांवर रोखले. संघात फारसे नावाजलेले खेळाडू नसताना हैदराबादने संपूर्ण स्पर्धेत सांघिक खेळाच्या जोरावर वर्चस्व राखले. विशेष म्हणजे 2009 व  2011 नंतर पुन्हा एकदा बँगलोरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 208 धावांचा डोंगर रचला. या  आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली व विध्वंसक फलंदाज ख्रिस गेल यांनी बँगलोरला तुफानी सुरुवात करून दिली. या दोघांचा  धडाका पाहता बँगलोर किती षटकांत बाजी मारणार, याची उत्सुकता होती. मात्र, बेन कटिंगने धोकादायक गेलचा बळी मिळवून हैदराबादला मोठे यश मिळवून  दिले.
गेलने केवळ 38 चेंडूंत 76 धावांचा तडाखा देताना 4 चौकार व 8 षटकारांची आतषबाजी केली. यानंतर स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणार कोहलीही अर्धशतक  झळकावून बाद झाला. कोहलीने 35 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 54 धावा काढल्या. कोहली-गेल यांनी बँगलोरला 114 धावांची वेगवान सलामी दिली. मात्र,  तरीही बँगलोरच्या फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही.
धडाकेबाज एबी डिव्हिलियर्सही केवळ 5 धावा काढून परतल्यानंतर बँगलोरच्या फलंदाजीला खिंडारच पडले. यानंतर लोकेश राहुल (11), शेन वॉट्सन (11),  सचिन बेबी (18), स्टुअर्ट बिन्नी (9) असे सर्वच प्रमुख फलंदाज फार काळ टिकू शकले नाही. कटिंगने 2 बळी घेतले, तर बरिंदर सरन, मुस्तफिझूर रेहमान व  बिपुल शर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले. अखेरच्या 4 षटकांत भुवनेश्‍वर व मुस्तफिझूर यांनी टिच्चून मारा करताना बँगलोरच्या फलंदाजांना जखडवून ठेवले.  तत्पूर्वी, कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक, तर युवराज सिंग व बेन कटिंग यांनी केलेला तुफानी हल्ला या जोरावर सनरायझर्स हैदराबादने बँगलोरला 209 धावांचे  मजबूत आव्हान दिले. मधल्या षटकात धावगती मंदावल्यानंतर युवराज व कटिंग यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने हिमालय रचला. वॉर्नरने पुन्हा  एकदा कॅप्टन इनिंग करताना 38 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 69 धावा फटकावल्या. तर, युवराजने 23 चेंडूंत 38 आणि कटिंगने 15 चेंडूंत नाबाद 39  धावांचा तडाखा दिला. ख्रिस जॉर्डन (3/45) व श्रीनाथ अरविंद (2/30) यांनी हैदराबादला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.
‘विराट’ विक्रम एका धावेने हुकला...
यंदाच्या आयपीएलमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला या वेळी क्रिकेट सम्राट सर डॉन ब्रॅडमन यांचा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा  विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी होती. परंतु विराटला एका धावाने हा विक्रम मागे टाकण्यात अपयश आले. 1930 साली झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी  974 धावा चोपल्या होत्या, तर यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीने 973 धावा फटकावल्या.