Breaking News

वातावरणीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती गठित

वातावरणातील बदल आणि त्याच्यावर होणारा परिणाम याबाबत सातत्याने व्यापक संशोधन करणे आणि पर्यावरण सक्षमीकरण सजग अशी नवीन यंत्रणा निर्माण करुन वातावरणीय बदलासाठी अनुकूल धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त तदर्थ समिती गठित करण्यात आली असून यात पर्यावरणमंत्री, पर्यावरण राज्यमंत्री यांच्यासह विधानसभेचे अकरा सदस्य व विधानपरिषदेचे चार सदस्य असे एकूण पंधरा सदस्य असतील असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे सांगितले.श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, वातावरणातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग हे एकविसाव्या शतकातील अत्यंत गंभीर विषय आहेत. निर्सगचक्र अनियमित झाल्याने जल-वायू सारखे नैसर्गिक स्त्रोत संकटग्रस्त झाले आहेत. शेतीवरचे संकट वाढले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे महानगरांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाणी प्रक्रिया यासारख्या समस्या वाढल्या आहेत. यावर राज्य शासनाने वैज्ञानिक पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सर्व विषय हाताळण्यास सक्षम नाही. पर्यावरण सक्षमीकरण आणि संशोधन यासाठी नवीन यंत्रणा तयार करुन त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. नद्याचे संरक्षण, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, जमिनीचा पोत सुधारणे इत्यादी बाबींचा समावेश होणार आहे.