Breaking News

पतंगराव कदम यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसस्कार

सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव शनिवारी पहाटेच मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले होते. पतंगराव यांचे चिरंजीव विश्‍वजीत कदम यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह विविध पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते. पतंगराव यांना मानणारा मोठा वर्ग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी मोठी गर्दी केली. अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.


पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर त्यांनी सातार्‍यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महा विद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण के ले.
आपल्या बालपणीच्या परिश्रमांची आठवण ठेवत त्यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना करत प्रत्येक वंचिताला, गरजूला शिक्षण मिळावे, याची सोय केली. अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबातील पतंगरावांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयात महिना 70 रुपये पगाराची नोकरी स्वीकारली. मात्र, स्वत:ची शिक्षण संस्था स्थापन करण्याचे ध्येय बाळगलेल्या पतंगरावांनी ती नोकरी सोडून 1964 मध्ये पुण्यातील कसबा पेठेत एका छोट्याशा खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. यावेळी पुण्यातील वृत्तपत्रांनी एका बोळामध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ बोळातच विसर्जित होणार, अशी टीकाही केली. तरीही पतंगराव डगमगले नाहीत. म्हणूनच आज भारती विद्यापीठाची ख्याती देशविदेशात आहे. तसेच या विद्यापीठाने सुवर्ण महोत्सवी वर्षाचा टप्पाही गाठला.