Breaking News

मतदारांच्या विश्वासामुळेचे टिकेकडे दुर्लक्ष हाच अजेंडा : आ. कोल्हे


कोेपरगांव : शहर प्रतिनिधी  - गेल्या साडेतीन वर्षांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युती शासनाचे सर्व मंत्री यांच्याकडून कोपरगांव मतदार संघाच्या विकासासाठी निधी आणतांना खूप दमछाक झाली. पण विकासाचे प्रश्न मार्गी लागले, याचे समाधान आहे. मागणारे खूप आहेत. मतदार संघ ते मंत्रालय तेथून पुढे केंद्रीय निधी त्यानंतर पुन्हा मंत्रालय ते मतदार संघ या प्रवासात पोस्टमनची भूमिका पार पाडते आहे. मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करीत टिकेकडे दुर्लक्ष करणे, हाच अजेंडा कायम ठेवला, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. 

सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत तालुक्यातील टाकळी ते सोनारी या रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण, पूल व पाईप, मो-या आदी १ कोटी ८६ लाख रूपये खर्चाच्या रस्ताकामाचे भूमिपुजन आ. कोल्हे यांच्या हस्ते रविवारी {दि. ४} पार पडले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपिन कोल्हे होते. दरम्यान, कोल्हे यांच्या हस्ते अर्थसंकल्पीय टाकळी प्रजिमा पाच ८७ लाख तर नाबार्ड अंतर्गत रामा पवार गिरणी गारदा नाला पूल १ कोटी २६ लाख रूपये खर्च करून पूर्ण झालेल्या दोन रस्त्यांचे लोर्कापणही यावेळी पार पडले.

प्रारंभी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगांवचे सहायक अभियंता संजय कोकणे यांनी प्रास्तविक केले. सरपंच राहूल देवकर, निलेष देवकर, चंद्रभान देवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अंबादास देवकर यांनी खडकी मार्गे टाकळी व मूर्शतपूर देवी या दोन रस्त्यांची कामे प्राधान्यांने मार्गी लागावी, अशी मागणी केली. माजी सभापती सुनिल देवकर यांनी आ. कोल्हेंच्या साडेतीन वर्षांचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी संजीवनीचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक फकिरराव बोरनारे, भास्कर भिंगारे, भीमराव भुसे, उत्तम चरमळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, साहेबराव रोहोम, शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष अंबादास देवकर, माजी सरपंच कैलास संवत्सरकर, बापूसाहेब सुराळकर, दगुराव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नारायण गवळी, बांधकाम व्यावसायिक सोमेश कायस्थ आदींसह पंचक्रोषीतील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. टाकळी ग्रामस्थ तसेच बांधकाम व्यावसायिक एस. आर. गिते, बनकर यांच्यावतीने आ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. संदीप देवकर यांनी आभार मानले.