डॉ. विखेंच्या नावे मिळालेला पुरस्कार ज्ञानोबा-तुकोबांचा सन्मान : हभप भोंदे
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्यावतीने तुकाराम बीज उत्सवानिमित्त आयोजित साई सच्चरित्र पारायण व तुलसी रामायण कथेची सांगता नरेंद्र महाराज गुरव यांच्या कल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर आयोजित पुरस्कार वितरण समारंभात भोंदे महाराज बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र विखे, माजी सरपंच काशिनाथ विखे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, त्रिंबकराव जोशी, भारत महाराज धावणे, देविदास म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी हभप भोंदे यांना मानपत्र, स्मृती चिन्ह व ११ हजार रुपये रोख रक्कम असा यावर्षीचा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे स्मृती संत सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले, मी कोणताही पुरस्कार स्विकारत नाही. ज्ञानोबा-तुकोबांनी समाजाच्या भल्यासाठी हाल-अपेष्टा सहन केल्या. त्यांना पोटभर अन्नही मिळत नव्हते. त्यांनी मान-सन्मान कधीच स्विकाला नाही. उलट अपमानच त्यांच्या वाट्याला आला. आपण त्यांचे अनुयायी आहोत. म्हणून मी हा पुरस्कार स्विकारण्यास नकार दिला होता. परंतु पद्मभूषण बाळासाहेब विखे आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे हे संत सेवक होते. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मी ज्ञानोबा-तुकोबांचा पुरस्कार म्हणून स्विकारत आहे. पण या पुरस्काराची रक्कम आळंदी येथील कृष्णदास लोहिया या संस्थेला दान करीत आहे.
प्रारंभी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेची व साईबाबांच्या ग्रंथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नरेंद्र महाराज गुरव यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन झाले. महाप्रसादाची बिजोत्सवाची सांगता झाली. यावर्षी साध्वी सर्वेश्वरी दीदी यांची तुलसी रामायण कथा झाली. तुकाराम महाराज मंदिर सभागृहात साईसच्चारित्र ग्रंथाचे पारायण भारत महाराज धावणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.