Breaking News

विमानतळासाठी शेतकर्‍यांची नाराजी, चर्चा करून मार्ग काढू - जिल्हाधिकारी

पुणे,  - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शेतकर्‍यांची नाराजी असून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केला. पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम डार्स या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून विमानतळासाठी पाणीपुरवठा कोठून करण्यात येईल, वीजपुरवठा, विमानतळाला जोडणारे रस्ते, विमानतळाचे प्रवेशद्वार कुठे असणार यावर काम सुरू आहे. त्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि डार्स कंपनी यांची बैठक झाली. यामध्ये याविषयावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी राव यांनी दिली.विमानतळाला जाण्यासाठी रस्ते महत्त्वाचे असून, त्यासाठी हडपसर ते सासवड आणि फुरसुंगी ते सासवड या दोन्ही मार्गांचे विस्तारीकरण करावे लागणार आहे. त्यासोबतच पीएमआरडीए रिंगरोड तयार करत आहे. या बरोबरच अन्य काही रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. विमानतळला वीर, नाझरे धरण किंवा थेट निरा नदीतून पाणीपुरवठा करता येतो का, याचा अभ्यास केला जाणार आहे. हे करताना पुढील 20 वर्षांसाठीचे नियोजन केले जाणार आहे. सध्या या धरणातील किती टिएमसी पाणी आरक्षित असून त्यातील किती पाणी घेता येईल, यासाठी लागणारा किती निधीची आवश्यकता असेल, याचा अभ्यास डॉर्स कंपनी करणार असल्याचे जिल्हा धिकारी राव यांनी सांगितले.