Breaking News

अंगणवाडीतील बालकांना आता ’पोषक वडी’

पुणे - अंगणवाड्यातील बालकांना पोषण आहाराबरोबरच आता ‘पोषक वडी’ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुले सुदृढ व्हावी आणि बालकांना पौष्टीक आहार मिळावा यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला असून, या पोषक वड्या गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती राणी शेळके यांनी दिली. जिल्हा परिषदेने 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये वय, वजन आणि उंची याबरोबर आहाराची माहिती घेण्यात आली. या तपासणीनंतर 343 बालके ही अतिकुपोषीत तर 1 हजार 523 बालके कुपोषीत आढळून आली. कुपोषित बालकांमध्ये परप्रांतीय आणि स्थलांतरीत मजुरांच्या मुलांची संख्या सर्वांत जास्त असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उसतोडणी, वीटभटी यासह बांधकामासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून किंवा राज्यांतून कामगार पुणे जिल्ह्यात येतात. पालक दिवसभर कामावर असतात, त्यामुळे त्यांच्या मुलांना पोषण आहार मिळत नाही. त्यांचे जीवनच स्थलांतरीत असते. त्याचा परिणाम मुलांच्या आहारावर होतो. तसेच, गर्भवती महिलांनाही पुरेशा आहार मिळत नसल्यामुळे नवजात बालकाचे वजन कमी भरते. त्याचा परिणाम शरिराच्या वाढीवर होतो. अंगणवाड्यांमधील मुलांना पोषण आहार मिळावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व बालकांना हा आहार दिला जातो. त्यामध्ये सुकडी, शेवई भात, डाळ खिचडी, लाफशी हे आहार दिले जातात. या आहाराबरोबरच बालकांना आता पोषक वडी देण्यात येणार आहे. यासाठी विशेष घटक योजनेतून 1 कोटी 89 लाख तर जिल्हा परिषदेकडून अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या पोषक वडीमुळे मुलांना पौष्टीक आहार मिळण्यास मदत होणार आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील बालकांना या वडीचे वाटप करण्यास सुरुवात होईल, असे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.