Breaking News

ड्रेजिंगविरोधात मुरबे ग्रामपंचायतीचा एकमताने ठराव मंजूर

पालघर, दि. 12, मार्च - अरोवाना पोर्टस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कुंभवली येथे होणा-या जेट्टीसाठी मेरिटाईम बोर्डाने पालघर जिल्हातील मुरबे-सातपाटी खाडीत गाळ काढण्याच्या नावाखाली यांत्रिकी पद्धतीने ड्रेजिंगला परवानगी दिली होती. त्याच्या निषेधार्थ मुरबे ग्रामपंचायतीने नुकताच विशेष ग्रामसभेचे आयोजन करीत एकमताने या विरोधात ठराव मंजूर केला.

मुरबे-सातपाटी खाडीत अनेक वर्षांपासून गाळ साचत असल्याने हा गाळ काढण्याची मागणी मच्छीमार सहकारी संस्था अनेक वर्षांपासून करीत असल्याचा फायदा उचलीत मे.अरोवाना कंपनीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिका-यांना हाताशी धरून गाळ काढण्याच्या नावाखाली खाडीत यांत्रिक पद्धतीने ड्रेजिंग करण्याची परवानगी मिळवली होती. ती रद्द करण्यात यावी यासाठी मुरबे ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश तरे यांच्या अध्यक्षतेखाली मुरबे येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप रिषदेचे सदस्य सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंन मेर, उपसरपंच नंदकुमार तरे, माजी जिप सभापती प्रभाकर चौधरी, संस्था अध्यक्ष केडी पाटील, माजी सरपंच तरे आदी मान्यवरासह शेकडो ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.