उन्हाची तीव्रता मार्च महिन्यातच
सातारा : मे महिन्यात जाणवणारी उन्हाची तीव्रता मार्च महिन्यातच जाणवत असून पठार, डोंगर माथ्यावरील झर्यातील पाणी कमी होत चालले आहे. त्यामुळे वन्यजीवांना पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणार्या कास पठारावरील कार्यकारिणी समिती व वनविभाग यांच्याकडून वन्यजीवांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सोय करण्यात आली आहे. येथील वीस कुंड्यांमध्ये वेळच्या वेळी पाणी सोडून वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवली जात आहे.सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाणारा कासपठार परिसर हिरवीगार दाट झाडी, झुडपांचा असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्राणीसंपदा आहे. यात बिबट्या, रानगवे, अस्वल, साळींदर, ससे, भेकर, माकड, रानडुक्कर, वानर तसेच अनेकविध पशुपक्ष्यांचा समावेश आहे. सध्या मार्च महिन्यायच कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वातावरणातील उष्णता वाढत चालली आहे. परिणामी पाण्याअभावी वन्य पशुपक्ष्यांची इतरत्र भ्रमंती न होता व त्यांच्या अधिवासात कोणताही बदल होऊ नये, यासाठी या वन्यजीवांसह पठारावर चरणार्या जनावरांनाही यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होऊ लागली आहे.सध्या कास परिसरात दिवसभर ऊन जाणवू लागले आहे. तसेच परिसरातील झर्यांचे पाणीही कमी होत चालले असून, काही ठिकाणी झरे आटण्याच्या मार्गावर आहेत. पठारापासून राजमार्गाने तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुमुदिनी तलावाचे पाणीही कमी होताना दिसत आहे. यामुळे कार्यकारिणी समिती व वनविभागाकडून तीन वर्षांपूर्वीच ठिकठिकाणी सिमेंटच्या पाण्याच्या कुंड्या पुरण्यात आल्या आहेत. वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, तसेच त्यांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यामध्ये पाणी सोडले जात आहे. पाणी कमी होत जाईल तसे दर एक-दोन दिवसाला या कुंड्यांमध्ये पाणी भरले जात आहे. त्यामुळे वन्यजीवाची तहान भागत आहे.