Breaking News

वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

सोलापूर, - द्राक्ष उत्पादनात अग्रस्थानी असलेल्या बार्शी तालुक्यातील पांगरी-कारी परिसरात द्राक्ष बागा विक्रीस आलेल्या असून द्राक्ष विक्रीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. बार्शी तालुक्यात वातावरणात आमुलाग्र बदल झाल्यामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्याच्या काही भागात गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावून द्राक्ष उत्पादकांना जबरदस्त झटका दिल्यामुळेे शेतक-यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजारपेठेत उठाव नसल्याच्या कारणावरून व्यापारी द्राक्ष बागा घेण्याचे टाळून शेतक-यांची परिक्षा पाहात असल्याचे चित्र पांगरी भागात दिसत आहे. बाजारपेठेतील दर समाधानकारक नसले तरी जेमतेम असल्याचे दिसून येत आहे. लहरी निसर्गामुळे शेतकरीही आपल्या बागांची विक्री करून मोक ळे होत आहेत. हवामान खात्याने अधूनमधून पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे व निर्यातक्षम द्राक्षांचे दर गडगडल्यामुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. पांगरीसह परिसरामधील उक्कडगाव, कारी, पांढरी, चिंचोली, ढेंबरेवाडी, घोळवेवाडी, टोणेवाडी, शिराळे, झानपूर, आगळगाव, येडशी आदी गावात द्राक्षांच्या विविध जातीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील 3 ते 4 वर्षे द्राक्ष उत्पादक शेतक-यांना डावणीचा प्रादुर्भाव अवकाळी पावसाचा फटका, मिलीब्गज, थ्रिप्स आदी अनेक नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्या तुलनेने यावर्षी आर्थिक भार पडलेला नाही.