Breaking News

रविवारी कृषि महोत्सवाच्या निमित्ताने पाटण तालुक्यात शिवसेनेच्या खेळाडूसमोर भाजपची बॅटींग

सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात गत विधानसभा व लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला सपशेल पराभवास सामोरे जावे लागले होते. याचा बोध घेत शिवसेना व भाजपने खेळी केल्यामुळे एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत, पंचायत समिती नगरपालिका व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये घुसवण्यास यश आले. आता तर शिवसेनेचा हात सोडून देण्याचा निश्‍चय करून सातारा जिल्ह्यातील पाटण व फलटण विधानसभा मतदार संघ वगळता सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. आता राज्य शासनाच्यावतीने आयोजित केलेल्या कृषि महोत्सवाच्या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या समारंभास राज्याच्या विविध विभागाचे सुमारे डझनभर मंत्री व सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने पाटण तालुक्यात शिवसेनेच्या खेळाडूच्या अंगणात भाजपची बॅटींग पहावयास मिळणार आहे. 


या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, भुकंप पुनर्वसन व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, आनंदराव पाटील, मोहनराव कदम उपस्थित राहणार आहेत. 
सातारा जिल्ह्यातील पाटण व फलटण हे दोन मतदार संघात भाजपला उमेदवार निश्‍चित करताना अनेक अडचणी आल्या होत्या. या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना गळ टाकला होता. मात्र, ते आमदार आहेत पण ते पूर्वीचे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकणार का? असा प्रश्‍न भाजप समोर उभा राहिला आहे. तर फलटण मतदार संघावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा प्रभाव असल्यामुळे येथेही उमेदवार निवडताना भाजपसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. सातारा जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसल्याने भाजपला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्याकडेच बराचसा भार टाकण्याची वेळ येते. तर सातारा, कोरेगाव, फलटण, खंडाळा, खटाव-माण, कराड, महाबळेश्‍वर, वाई या तालुक्यात भाजपला मानणारे लोक आहेत. मात्र त्यांची संख्या स्पष्टपणे समजू शकत नाही. अशी स्थिती असल्याने भाजपने सातारा जिल्ह्यावर जास्त केंद्रिकरण केले आहे. विविध विकास कामाच्या निमित्ताने लोकांमध्ये मिसळून लोकांच्या खर्‍या गरजांची माहिती घेणे तसेच या निमित्ताने सातारा जिल्ह्यात विविध विकास कामाची उद्घाटने तसेच पाहणी दौरे आयोजित करण्यावर भाजपने भर दिला असल्याचे दिसून येत आहे. कृषि महोत्सवाच्या निमित्ताने पाटण, कराड या तालुक्यात मोठी राजकीय घडामोड झाल्याची पहावयास मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.