Breaking News

‘अर्थ’हीन अर्थसंकल्प - खा. अशोक चव्हाण

मुंबई  - कोणतीही ठोस आकडेवारी न देता केवळ ‘पुरेशी’ तरतूद या शब्दांचा भडीमार करून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘अर्थ’हीन असून भाजप सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे, अशी प्रखर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

फडणवीस सरकारच्या चार वर्षाच्या काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेची ‘पुरेशी’ वाट लागलेली आहे असा टोला लगावत सदर स्थिती आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाली आहे व आज अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या तुटीच्या अर्थसंकल्पामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे असे खा. चव्हाण म्हणाले. गतवर्षी जवळपास 4 हजार 511 कोटी रू. महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर क रण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात सुधारित अंदाजान्वये ही महसूली तूट 14 हजार 844 कोटी रूपयांपर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. यावर्षी प्रत्यक्षात 15 हजार 374 कोटी महसूली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. भविष्यातील सुधारित अंदाजान्वये ही तूट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भाजप सरकारच्या कालावधीत राज्याची अर्थव्यवस्था ढासळून अर्थशून्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.