Breaking News

एनडीसीसी बँकेने दिली 166 कोटींची शेतकरी कर्जमाफी

नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयातील 53 हजार 776 शेतकरी सभासदांना 317 कोटी 44 लक्ष रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे 23 हजार 714 शेतकरी सभासदांना 166 कोटी 27 लक्ष रुपयाच्या प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती एनडीसीसी बँकेच्या प्राधिकृती अधिकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आज,शुक्रवारी दिली.

या योजनेअंतर्गत शासनाने दिलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये एनडीसीसी बँकेच्या 23 हजार 118 सभासदांना दीड लक्ष रुपयापर्यंतचे थकीत असलेले 157 कोटी 60 लक्ष रुपयाची कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. तसेच एकमुक्तमध्ये (ओटीएस) 603 शेतकरी सभासदांना दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरल्यामुळे 8 कोटी 67 लक्ष रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र असलेल्या शेतकरी सभासदांना कर्जमाफी मिळण्यासाठी अर्ज सादर केला नाही अशा सर्व पात्र शेतकरी सभासदांनी 31 मार्च 2018 पर्यंत जवळच्या सेतू केंद्रा अथवा संग्राम केंद्रात जावून कर्जमाफी योजनेचा अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकरी सभासदांनी 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 या कालावधीत पीक कर्ज रक्कम उचलून दिनांक 31 जुलै 2017 पर्यंत थकीत आहे. अशा सर्व पात्र शेतकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत यापूर्वी कर्जमाफी मिळण्यासाठी अर्ज सादर केला नाही त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज सादर करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.