Breaking News

दखल..... ऋणातच राहणे पसंद...

दि.18 मार्च 2018 रोजी दै. लोकमंथन दशकपुर्तीचे बातमीपत्र प्रकाशित करताना ओलवत्या डोळ्यांनी, सदगतीत झालेले मन सहजपणे भुतकाळाकडे झुकू लागले. आज मी स्वतः अशोक सोनवणे आणि दै. लोकमंथन ज्या जागेवर उभा आहे, ते स्थान मिळवण्यासाठी मी व्यक्तीशः केलेल्या धडपडीत अगणित हातांचे सहाय्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभले याची जाणीव भुतकाळात डोकावणारे मन करून देत आहे. कुठल्याही यशाला असंख्य कंगोरे असतात. त्या प्रत्येक कंगोर्‍याला कुणा ज्ञात अज्ञाताचा आधार असतोच असतो. त्याची जाणीव ठेवून संधी मिळेल तिथे कृतज्ञता व्यक्त करणे हे यशवंताचे प्रथम कर्तव्य ठरते. या कर्तव्याला बांधिल राहून अकराव्या वर्षातील लोकमंथनचे पहिले बातमीपत्र प्रकाशित क रताना आमच्या यशात यथाशक्ती वाटा उचलणार्‍या त्या प्रत्तेकाच्या कृतज्ञतेची दखल घेणे आवश्यक वाटते.
शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे संत वचन माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्यावर मिळालेल्या यशाचे मानकरी आहे. मी ज्या कुटुंबात जन्माला आलो, त्या सोनवणे कुटुंबातील कर्ते पुरूष माझे वडील कै. विठ्ठल दादा सोनवणे. आई कै. लिलाबाई विठ्ठल सोनवणे थोरले चुलते कै. एकनाथ दादा, विश्‍वनाथ दादा यांचे समाजसेवी संस्काराचे बाळकडू मिळाल्याने समज आली तेंव्हापासून गाव गल्लीतील अन्यायाविरूध्द मनात उसळी मारणारी चीड अस्वस्थ करू लागली. वडिलांना अवगत असलेल्या चौदा भाषा माझ्यासाठी आव्हनात्मक आदर्श होता. वडिलांचे भाषा पांडित्य मिळवू शकलो नसलो तरी चौदा किंबहूना अधिक भाषा वासियांशी संबंध प्रस्थापित करून वेगवेगळ्या प्रांतांतील समाज व्यवस्थेचा जवळून अभ्यास करणे शक्य झाले, ते वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच. स्थापत्य अभियांत्रिकीची (सिव्हील) पदवी संपादन करून बांधकाम क्षेत्रात पाय ठेवतांना वाड वडिलांकडून मिळालेल्या संस्कारक्षम शिदोरीचे पाठबळ फायदेशीर ठरले. इतकेच नाहीतर आजपर्यंतच्या प्रवासात आलेल्या प्रत्येक अडचणीतून तावून सुलाखून सुखरूप बाहेर पडण्यासाठी देखील त्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहीले, आहेत, भविष्यातही राहतील.

पंख फुटल्यानंतर आकाशात भरारी घेणार्‍या पाखराला कौटूंबिक आधारासोबत समाजाचेही तितकेच पाठबळ आवश्यक ठरते. या दृष्टीने मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी स्वतः एखाद्या एकांत क्षणी माझ्या एकूण विचारधारेचा आणि स्वभाव प्रवृत्तीचा विचार करतो तेंव्हा माझ्या सभोवताली गोळा झालेला वेगवेगळ्या विचारधारेचा जनसंपर्क पाहून स्वतःच आश्‍चर्यचकीत होतो. कळत न कळत प्रासंगीक मतभेदांनंतरही समोरच्या माणसाचं मन ओळखून सावरण्याचा प्रयत्न मला या गोतावळ्यात स्थिरावण्यास कारणीभूत ठरला हे प्रांजळपणे कबूल करतांना कुठलाही कमीपणा वाटत नाही. माणूस वाईट नसतो, एखादा प्रसंग तेवढ्यापुरता त्या माणसाला तशी बुद्धी देतो, परिस्थिती निर्माण होते, याची जाणीव ठेवून प्रत्येक पाऊल टाकल्याने आजचा हा दिवस माझ्या आयुष्यात आहे.
माझे राजकीय आणि सामाजिक विचार स्पष्ट आहेत. मी राजकीय विचारांचा नाही तर सामाजिक विचारांचा बांधिल आहे. समाज तो कुठलाही असो, प्रत्येक समाजात आहे रे, नाही रे असे दोन वर्ग असतात. त्यातील आहे रे कडून नाही रे मंडळींवर होणारा अन्याय निवारण करणे ही माझी खरी विचारधारा आहे. आजच्या समाजात पुरोगामी आणि प्रतिगामी आणखी सनातनी अशी वर्गवारी सांगीतली जाते. या वर्गवारीचा थेट जातीशी संबंध जोडला जातो. प्रत्यक्षात ही वर्गवारी जातीशी नाही तर प्रवृत्तीशी नाते सांगते असे माझे प्रांजळ मत आहे. आणि या प्रवृत्ती सर्वच जाती धर्म पंथात कमी अधिक प्रमाणत वावरत आहे.ही माझी मुळ विचारसरणी असल्याने तारूण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अन्यायाविरूद्ध प्रहार करणार्‍या जहाल, आक्रमक भाषणांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. मात्र त्याच वेळी मंडल आयोगाच्या निमित्ताने काही राजकीय विचारधारांनी  जवळपास शेकडो जातसमुहांना न्याय मिळवून देणार्‍या मंडल आयोगाला केलेला विरोध मनात संतापाची तिडीक उठवून गेला आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरून दीनदलित उपेक्षितांना आरक्षणाचा हक्क मिळवून देण्याची उर्मी जागली. बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांच्या प्रश्‍नांवर केलेले चिंतन आणि त्यासाठी उभारलेला लढा मराठा - मुस्लिम आरक्षण चळवळीतील निरपेक्ष वास्तवादी भूमिका यातून 374 जात समुहाच्या प्रतिनिधींनी केलेले सहकार्य मला इथपर्यंत पोहोचविण्यात मोलाची साथ देऊन गेला. 
माझ्या राजकीय आणि सामाजिक यशात आणखी एका नावाचा उल्लेख जितका क्रमप्राप्त तितकाच अपरिहार्य आहे. विश्‍वरत्न महामानवांच्या विचाराचा वारसा सांगणारे अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या सहवासात मला मिळालेली प्रेरणा आयुष्याच्या अखेरपर्यंतची शिदोरी आहे. 
शिवसेनेतील तत्कालिन सहकारी, ओबीसी चळवळीतील लढवय्ये मित्र, भारिप बहुजन संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना तळागाळातील कार्यकर्त्यांसह प्रदेश पातळीवरील नेतेमंडळींचे मिळालेले बहुमुल्य सहकार्य हे माझ्या यशात मोलाचे वाटेकरी आहेत. सामाजिक चळवळ करत असताना लोकशाहीचा घटनात्मक नसला तरी महत्वाचा आधारस्तंभ असलेला पत्रकार हा ही माझ्या यशाच्या वाटचालीचा वाटेकरी आहे. नामोल्लेख करायचा म्हटलं तर राजाराम नाचर, भागा वरखडे, बाजीराव खांदवे, सुभाष पांगे, कै. एडके, सुभाषशेठ गुंदेचा, सुधीर मेहता, प्रकाश भंडारे, रामदास ढमाले, नंदकुमार सातपुते, हरिभाऊ जपे, दीपक मेढे, धनराज गांधी, सय्यद निसारभाई, रंजन साळवी, कुमार क डलग, बाळकुणाल अहिरे, पुरुषोत्तम सांगळे, सुनिल तांबुसकर, बाळ ज. बोठे, पुरूषोत्तम आवारे, गोविंदसिंग रजपुत, देवेंद्र ढाका, चंद्रकात सोनवणे, दादाभाऊ अभंग यांच्यासह शेकडो ज्ञात-अज्ञात पत्रकारांनी मला वेळोवेळी दिलेला आधार विसरता येणार नाही. एका बाजूला या पातळीवर काम करत असताना कुटूंबाला देण्यासाठी शिल्लक नसलेला वेळ भरून काढण्याची जबाबदारी जिच्यावर होती आणि आहे ती माझी धर्मपत्नी हिचा नामोल्लेख केला नाही तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. ठेकेदार माणुस, साप्ता हिकाचा संपादक, चळवळीचा कार्यकर्ता आणि जाहिर सभांमध्ये आक्रमक भाषण ठोकणारा कुटूंबाप्रती असलेले कर्तव्य देण्यात कसूर करतो तरीही अर्धांगीणी म्हणूून माझ्या आयुष्यात आलेली पत्नी, माझी भूमिका पटो ना पटो तीचे कर्तव्य बजावताना मात्र हो साठी हो करून माझे समाधान करीत होती. ही सल भूतकाळात डोकावताना आजही कायम आहे. अर्थात या सर्व ज्ञात-अज्ञात सहकार्‍यांचे या क्षणी आभार मानणे, त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य असले तरी या कर्तव्याशी मी प्रतारणा करू इच्छितो, मला या सर्व सहकार्‍यांचे ते योगदान विसरायचे नाही, म्हणून त्यांचे आभार प्रकट करण्याऐवजी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो.