Breaking News

एम्पायर इस्टेट पुलाचे काम अंतिम टप्प्यात


पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात एम्पायर इस्टेट पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या रंगरंगोटीचे आणि ’इक्स्पाईंज’ जॉईंट बसविण्याचे काम सुरु आहे. हा पूल 1.6 किलोमीटर लांबीचा असून शहरातील पहिला सर्वांत लांब पूल असणार आहे. पवना नदी, लोहमार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग ओलांडून जाणारा हा पूल असणार आहे. एप्रिल अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती, उपअभियंता व बीआरटीएसचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.एम्पायर इस्टेट या या पुलाला 2010 मध्ये मान्यता मिळाली. प्रत्यक्षात 6 एप्रिल 2011 ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. आता पुलाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरील बीआरटीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. एम्पायर इस्टेट हा पूल शहरातील सर्वांत जास्त लांबीचा पूल असणार आहे. पवना नदी, लोहमार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडून जाणारा हा पूल आहे. शहरातील नागरिकांना पूर्वेकडून पश्‍चिमेकडे या पुलावरून जाता येईल. काळेवाडी फाट्यापासून हा रस्ता सुरू होत असून त्यानंतर पुलावरून ऑटो क्लस्टरपर्यंत तसेच पुढे केएसबी चौक, चिखलीगावापर्यंत जाता येईल. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरून वाहनांना आणि बीआरटीला स्वतंत्र मार्ग असेल. एमएम शाळा ते पवना नदी रस्त्याचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यावर एम्पायर इस्टेट पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा मार्ग मोकळा होईल. पुलाच्या रंगरंगोटीचे काम सुरु आहे. एप्रिलअखेरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या पुलाचे फायदे मोठ्या प्रमाणात होणार असून काळेवाडी भागातून चिंचवड औद्योगिक वसाहतीत लोकांना थेट जाता येईल.पिंपरी, चिंचवड गावांतील अंतर्गत वाहतुकीवर ताण कमी होईल. वाकड, पिंपळे निलख, काळेवाडी, हिंजवडी, ताथवडे, किवळे, रावेत येथील प्रवाशांना उपयुक्त आहे. कुदळवाडी, मोशी, भोसरी, देहू, आळंदी, संभाजीनगर, शाहूनगर, चिखली भागातील प्रवाशांना पूर्वेकडे जाण्यास उपयुक्त होणार आहे.