Breaking News

सिंहगड किल्ल्यावर 1.8 किमी लांबीचा रोप-वे ?


पुणे : सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आता वाहतूक कोंडी, दरड कोसळणे या प्रकारापासून पर्यटकांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. लवकरच सिंहगड किल्ल्यावर 1.8 किमी लांबीचा रोप-वे’ उभारला जाणार आहे. मुंबई येथे मागील महिन्यात झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषदेमध्ये सिंहगड किल्ल्यावरील रोप-वे ची प्रतिकृती मांडण्यात आली होती. या प्रकल्पाला वन विभागाकडून मान्यता मिळालेली असून एकूण 116 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. यातील सुमारे 41 कोटी हे रोप-वे साठी खर्च करून एका खासगी कंपनीच्या माध्यमातून हे काम करून घेण्यात येणार असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.
सिंहगड किल्ल्यावर जाणार्‍यांसाठी होणारी वाहतूक कोंडी, दरड कोसळणे यामुळे रस्ता बंद करावा लागतो. यामुळे पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी त्रास होतो. आता मात्र सिंहगड किल्ल्यावर 1.8 किमी लांबीचा रोप-वे’ उभारला जाणार आहे. या सुविधेमुळे पर्यटकांना गडावर जाणे सोपे होणार आहे. तासाला सुमारे 100 पर्यटक रोप-वेने कि ल्ल्यावर जाऊ शकतात. सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आतकरवाडी येथून पायवाट आहे. आतकरवाडी ते किल्ल्यावर असलेल्या दूरदर्शनच्या टॉवरशेजारी रोप-वे प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यामुळे, सिंहगडावर पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.