आम्ही राजकारण धंदा म्हणून करत नाहीत : सभापती नागवडे
याबाबत अधिकची समजलेली माहिती अशी की , श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे ,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा , बाळासाहेब गिरमकर, राजेंद्र म्हस्के, अनिल टवाळ, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नाहाटा यांनी सुरवातीला चिमटा काढत आम्ही ज्यांच्यासाठी राजकारणात मदत केली. त्यांनीच आमच्यासाठी खड्डे खोदण्याचे काम केले. मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जवळच्यांनी घात केला. अशा शब्दात अप्रत्यक्ष नागवडे कुटुंबावर टीका केली. पण आपले भाषण संपताच नाहाटा कार्यक्रम सोडून निघून गेले. पण हि टीका अनुराधा नागवडे यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे त्यांनी लगेच त्याच ठिकाणी प्रति उत्तर दिले. त्या म्हणाल्या आम्ही राजकारण धंदा म्हणून करत नाही. नागवडे कुटुंबांनी कधीच तडजोडीचे राजकारण केले नाही. आम्ही जे करतो ते कार्यकर्त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करतो. स्वहिताचा कधीच विचार केला नाही. पण आपल्या तालुक्यात काहींनी राजकारणाचे पूर्णतः वाटोळे करून टाकले आहे. राजकारण म्हणजे त्यांनी धंदा केला आहे. त्यामुळेच अश्या प्रवृत्तीना जनता ओळखून आहे. त्यामुळे यापुढे नागवडे कुटुंबावर आरोप करताना भान ठेवावे. योग्यवेळी अशा प्रवृतीना उत्तर दिले जाईल. असे संतप्त होत नागवडे म्हणाल्या, त्यामुळे उपस्थित सर्वच नेत्यांनी भुवया उंचावल्या होत्या. पण सभापती नागवडे यांचा आक्रमकपणा पाहून उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली हे मात्र नक्की.