Breaking News

ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली


कुळधरण : किरण जगताप । कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला आहे. रिक्षा, जीप, टेंपो अशा वाहनांमधून नियमबाह्य, अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने हा प्रकार प्रवाशांच्या जीवावर बेतला जात आहे. शहरात किमान काही प्रमाणात अशा अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. त्यामुळे कुळधरण, खेड, राशिन आदी ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक रामभरोसे असल्याचे चित्र आहे.

कर्जत-कुळधरण, राशिन-कुळधरण-कोंभळी, खेड-राशिन, सिध्दटेक-राशिन आदी रस्त्यांवर ही अवैध वाहतूक सर्रासपणे पहावयास मिळत आहे.वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍यांचे संबंध इतके मधूर आहेत की, जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही असे चित्र दिसते. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आदी वाहनांत प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक प्रवासी बसविले जातात. अनेकदा शाळकरी मुले व इतर प्रवाशांची थेट टॅक्सीला मागे लटकून किंवा वर टपावर बसवून वाहतूक होताना दिसते. अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. त्यानंतर परिस्थिती जैसे थे होते.

ग्रामीण भागात राज्य परिवहन मंडळाकडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे. बसची अपुरी संख्या, प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे आणि कधी एकाच तासात तीन-चार बस असणे, असे प्रकार ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बस स्थानकांना खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा पडलेला असल्याने या वाहतुकदारांचे दलाल बसस्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. यातील काही वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत, शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करण्यात येते. या फायद्याच्या गोष्टींमुळेही बसऐवजी प्रवाशांकडून रिक्षा, टॅक्सी सेवेला प्राधान्य दिले जाते. प्रवाशांच्या दृष्टीने हे सोयीचे असले तरी खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायकही आहे. बस चालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते.


याउलट खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिवसातून अधिकाधिक फेर्‍या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षिततेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. कर्जत तालुक्याच्या सर्वच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठलेला दिसून येतो. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबून भरलेले असतात. एकेका रिक्षामध्ये दहापेक्षा अधिक तर, टॅक्सी किंवा अ‍ॅपेरिक्षात हीच संख्या 15 ते 20 दरम्यान गेलेली दिसते. आठवडे बाजार, यात्रोत्सव किंवा लग्नसराईत तर खासगी प्रवासी वाहतूकदारांची चांदीच असते. वाहनाच्या मागे, टपावर तसेच पुढील भागावरही प्रवासी बसविलेले असतात. ही धोकादायक वाहतूक पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्याविरूध्द कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांना हाताशी धरुन कारवाईपासून मुक्तता मिळविली जात असल्याची चर्चा नियमित होत राहते. मात्र योग्य कारवाई होत नसल्याने पुढे येवून तक्रार द्यायला कोणी तयार होत नाहीत.

पोलिसांकडे जराही अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले तरी कारवाई होते. असे वाहनचालक खासगीत सांगतात. बर्‍याच वेळा वाहनांची तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच कळलेले असते. अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या एखाद्या वाहनास अपघात झाल्यावर या विषयाचा गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना काही दिवस कारवाईचा फार्स करणे भाग पडते. वरीष्ठ अधिकार्‍यांनी नियमितपणे ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीस आळा बसू शकेल.