Breaking News

शेवगाव शहरात दिंडीचे स्वागत

नाथ षष्ठी निमित्त पैठण येथे निघालेल्या रायतळे ता. पारनेर येथील श्री सद्गुरू शांतानंद आनंद आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट या दिंडीचे शेवगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय कोळगे व ज्ञानेश्‍वरचे संचालक काकासाहेब नरवडे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध व उत्कृष्ट नियोजन या दिंडीचे असून दिंडी मध्ये महिला पुरुषांसह साडेतीनशेहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. प्रत्येक पुरुषांच्या अंगावर पांढरी वस्त्रे तर महिलांनी भगवी साडी डोक्यावर तुळशी वृंदावन तर पुरुष बांधवांच्या हातामध्ये भगव्या पताका यामुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. तसेच ज्ञानोबा तुकोबा यांच्या जयघोषाने परिसरातील वातावरण अगदी भक्तिमय झाले होते. स्वयम् शिस्तीमुळे ही दिंडी सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरली होती. तसेच या दिंडीला नऊ वर्ष पूर्ण झाले असून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. दिंडी चालक ह.भ.प. महादेव महाराज काळे यांनी दिंडीचे अगदी शिस्तबद्ध व चोख नियोजन केल्यामुळे वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण आले होते. यावेळी वरुरचे माजी सरपंच मधुकर वावरे, अमरापूरचे माजी सरपंच विजय पोटफोडे, गणेश काळे, विजय कोळगे, व हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.