Breaking News

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाबाजी जाधव बिनविरोध

रत्नागिरी, दि. 19, मार्च - रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष खेडचे बाबाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट ्रवादी काँग्रेसचे निरीक्षक माधव कोंडविलकर यांनी ही निवड जाहीर केली. निवडीनंतर माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.


रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चिपळूण येथील पाग महिला विद्यालयात बैठक झाली. बैठकीला जिल्हा कार्यकारिणी व नवनियुक्त सर्व तालुकाध्यक्ष, सर्व शहरप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाचे सरचिटणीस रमेश दळवी यांनी जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया स्पष्ट केली. या निवडीसाठी पक्षाचे निरीक्षक कोंडविलकर उपस्थित होते.
आपल्याला संस्थेच्या कामामुळे पक्षाला पुरेसा वेळ देता येत नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. त्यामुळे आपल्याला आता पुन्हा संधी नको, असे विद्यमान अध्यक्ष शेखर निकम यांनी जाहीर केले. त्यानंतर खेडचे प्रदेश चिटणीस व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांचे नाव पुढे आले. त्यांना सर्वांनी पाठिंबा दर्शविला व त्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.