Breaking News

अण्णांना अपेक्षित लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अपेक्षित असलेला लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच नियुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
रामलिला मैदान येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज उपोषण सोडले. यावेळी श्री. हजारे यांच्या मागण्या मान्य केल्याचे निवेदन सोपविल्यानंतर मंचावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या विविध मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्या असून यासंदर्भातील प्रधानमंत्री कार्यालयाचे पत्र आज आम्ही सोपविले आहे. देशात भ्रष्टाचार मुक्त वातावरणासाठी केंद्र शासन श्री. हजारे यांना पूर्ण समर्थन देते. यासंदर्भात केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त नेमण्याबाबत श्री. हजारे यांनी केलेल्या मागणीवर केंद्र शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. या संदर्भात संशोधन करण्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे. हे संशोधन पूर्ण होताच देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात लोकायुक्त नियुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली.