Breaking News

मराठी विद्यापीठासाठी नेवासा तीर्थक्षेत्राचे नाव प्राधान्य क्रमात


कुकाणा / प्रतिनिधि/ - मराठी भाषेचे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगा अंतर्गत होणाऱ्या विद्यापीठासाठी नेवासा तीर्थक्षेत्राचे नाव प्राधान्यक्रमात असल्याचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मराठी भाषेला अभिमत भाषेचा दर्जा मिळावा. व मराठी भाषेचे विद्यापीठ नेवासा येथे व्हावे. या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. यावेळी विनोद तावडे यांनी सांगितले.

२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून, गेले ४ वर्षापासून नेवासा येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. मराठी भाषेचे विद्यापीठ नेवासा येथे व्हावे यासाठी प्रयत्न होत आहेत. या मागणीसाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा देखील पहिल्यापासून हातभार लागत आहे. या मागणीचे पहिले निवेदन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह संस्कृती युवा प्रतिष्ठानने २७ फेब्रुवारी २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०१६ रोजी १ हजार सह्यांचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना पाठवले होते. तर २७ फेब्रुवारी २०१७ रोजी नेवासा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाला नेवासा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच धार्मिक क्षेत्रातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांनीही सहभाग नोंदवीत भाग घेऊन पाठींबा दिला होता. यावर्षी देखील नेवासा तहसील कार्यालयात संस्कृती युवा प्रतिष्ठानने तहसीलदारांना निवेदन दिले होते. आणि आंदोलनाचा इशाराही दिला होता. यावेळी संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकुंद अभंग, शब्दगंधचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत, प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, पत्रकार संघटनेचे सुधीर चव्हाण, मकरंद देशपांडे, अनिल गर्जे, राजेंद्र चौधरी हे उपस्थित होते.