Breaking News

दोन-दोन हजार रुपयांसाठी नगरसेवक पालिकेच्या ओट्यावर बसतात: संजय फंड


श्रीरामपूर/ शहर प्रतिनिधी/ - नगरसेवक दोन-दोन हजार रुपये घेण्यासाठी पालिकेच्या ओट्यावर बसतात. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दारू पिण्यासाठी पैसे घेतात. अशी वेळ नगरसेवकांवर आली आहे. ही शोकांतिका असून ससाणे यांच्या कार्यकाळात असे कधी घडले नाही. ससाणेनी मंजूर केलेल्या रस्त्यांचेच सत्ताधारी पुन्हा उदघाटन करीत आहेत. गेल्या दीड वर्षात दमडी सुद्धा निधी सत्ताधाऱ्यांनी आणला नाही. असा आरोप पालिकेतील काँग्रेसचे पक्षप्रतोद संजय फंड यांनी केला. 

गुरुवारी,८ मार्च रोजी नगराध्यक्षा अनुराधा यांनी उदघाटन केलेल्या जिजामाता चौक ते शंकर भवन रस्त्याचे आज शुक्रवारी संध्यकाळी पुन्हा काँग्रेसने उदघाटन केले. त्यावेळी नगरसेवक संजय फंड बोलत होते. यावेळी नगरसेवक बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, श्रीनिवास बिहणी, अल्तमश पटेल माजी नगरसेवक संजय छल्लारे, नगरसेवक दिलीप नागरे, नगरसेविका मीरा रोटे, चंद्रकला परदेशी, अशोक उपाध्ये, सिद्ध्यर्थ फंड, निलेश भालेराव आदी उपस्थित होते. 

संजय फंड पुढे म्हणाले की, मागील २५ वर्षात रस्त्यांसाठी उपोषण करण्याची वेळ कधी आली नव्हती. स्टेट बँक परिसरात अनेक शाळा, रुग्णालये असून नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, केवळ विरोधकांचा प्रभाग असल्यामुळे सदर रस्ता जाणीपूर्वक करण्यात आला नाही असा आरोप त्यांनी केला. ठराविक दोन तीन लोक पालिकेचा कारभार पाहत असल्याचे सचिन गुजर यांनी यावेळी सांगितले.नगरसेविका चंद्रकला परदेशी यांनी, साऱ्या रस्त्याचे कामे अर्धवट झाले असल्याचे सांगत जर रस्त्याचे कामे झाली नाही. तर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते