Breaking News

नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा नामकरण सोहळा संपन्न

येथील नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतीचा नामकरण सोहळा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला. श्रीगोंदे नगरपरिषदेच्या ईमारतीला श्रीमंत महादजी शिंदे प्रशासकीय ईमारत असे नाव देण्यात आले. यावेळी मा. मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले की, आपल्याकडे कोणते पद असो किंवा नसो आपले सरकार असले किंवा नसले तरी तालुक्यात आपण विकासकामांचा सपाटा चालूच ठेवला आहे. श्रीगोंदे शहरातील चौकांना महापुरुषांची नावे द्यायला हरकत नाही. परंतू पुतळे बसवायला सरकार मान्यता देत नाही पुतळे बसविल्यास त्यांची विटंबना होते. त्यामुळे गावची शांतता भंग होते असे पाचपुते यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की नगरपालिकेपेक्षा कोणीही मोठे नाही. त्यामुळे रस्त्यांच्या कामात येणारे अडथळे दूर करून रस्ते बनवा, नगरपालिकडे येणार्‍या सूचनांचा स्वीकार करून सुधारणा करा. शहरातील सांडपाणी नदीला न सोडता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी 
योग्य उपाययोजना करण्याची सूचना पाचपुते यांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना केली.


तसेच श्रीगोंदे बसस्थानक परिसरातील सर्व अतिक्रमणे काढून तिथे रस्त्याचे काम करण्याच्या सूचना देतानाच शनिचौकातील अतिक्रमण केलेल्या टपरयांसाठी नगरपालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्याची सूचना देखील पाचपुते यांनी यावेळी केली. यावेळी नगराध्यक्ष मनोहर पोटे म्हणाले की, श्रीगोंदे शहरात विकासकामे जोरात सुरू आहेत. श्रीगोंद्याची आता खेड्याकडून खर्‍या अर्थाने शहरीकरणाकडे वाटचाल होत आहे. विकासकामे करताना जर काही चुका होत असतील तर जनतेने त्या आम्हाला सांगाव्यात, त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यावेळी बाबासाहेब भोस, प्रा. तुकाराम दरेकर, देशमुख यांची देखील भाषणे झाली श्रीगोंदे ही ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखली जाते. आज श्रीगोंदे नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतीला श्रीमंत महादजी शिंदे यांचे नाव दिल्यामुळे शहराच्या वैभवात भर पडल्याचे मत सर्वंनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्षा अर्चना गोरे, माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, नगरसेवक नानासाहेब कोथिंबीरे, बापूशेठ गोरे, अशोक आळेकर, सतीश मखरे, अशोक खेंडके, सुनील वाळके, डॉ. स्मिता तरटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केले.