Breaking News

नराधम बापानेच केला मुलीचा विनयभंग संगमनेरात दोन घटना

शहर आणि तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना घडल्या. पहिली घटना ही शहरात तर दुसरी घटना ही तालुक्यातील खराडी गावात घडली. या दोन्ही घटनांप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 

पहिली घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरात घडली. या घटनेत आरोपी नराधम बापाला पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरी घटना तालुक्यातील खराडी गावात घडली. चंद्रभान दत्तू दिघे {खराडी ता. संगमनेर} याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी {दि. १७} दुपारी तीन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आपल्या घरी एकटी असताना तिचे वडील घरात आले असता त्याने आक्षेपार्ह वर्तन करत मुलीला लज्जा वाटेल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. मुलीने नराधम बापाच्या कृत्याचा विरोध केला असता त्याने तिला बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी मुलीच्या फिर्यादीवरून तिच्या बापाविरोधात {भादविक ३५४ (अ), ३२३, ५०४ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे} गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि शंकरसिंग राजपूत करीत आहे.

तर दुसऱ्या घटनेत मामींबरोबर नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना खराडी गावात घडली. याबाबत पिडित मुलीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिडित अल्पवयीन मुलगी आपल्या मामींसोबत तालुक्यातील खराडी येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी आली होती. यावेळी आरोपी चंद्रभान दत्तू दिघे {रा. खराडी} याने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा विनयभंग केला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास सपोनि गोपाळ उंबरकर करीत आहेत.