नगरपरिषदचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी दिनांक 5 मार्च रोजी मोठा फौजफाटा घेऊन शहरातील पाणीपट्टी व घरपट्टी थकबाकीदारांवर कारवाई करत दुकाने सील करण्याची कारवाई केल्याने थकबाकीदारांची चांगलीच धावपळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरात पाणीपट्टी व घरपट्टी वसूलीची मोहीम राबविली जात होती. मात्र या मोहीमेला थकबाकीदारांकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्याधिकारी महानवार यांनी दि. 5 मार्च रोजी सहाय्यक कर निरीक्षक शिरसाठ, काकासाहेब अढागळे, राजू शेख, राजेंद्र खंगले, किशोर साळवे, राजेंद्र पवार, नरेंद्र मोरे, भाऊसाहेब ढोकणे, बाळासाहेब पवार, एकनाथ जगधने आदिंचे पथक तयार करुन थकबाकीदारांचे दुकाने सील करण्याची कारवाई केली. यामध्ये एका दिवसात तब्बल 1 लाख 69 हजार रूपयांची वसूली करण्यात आली. मात्र नगरपरिषदेची कारवाई ही फक्त सामान्य नागरीक व छोट्या व्यापार्यांवर झाल्याची चर्चा शहरात सुरु होती. शहरात अनेक मोठे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे अनेक वर्षापासूनची लाखो रुपये थकबाकी आहे. या धन दांडग्या व मोठ्या व्यापार्यांकडे पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक पाठ फिरवल्याचे दिसून आले. याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता सर्व थकबाकी दारांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आजपर्यंततरी एकाही मोठ्या व्यापार्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने सामान्य नागरीक व छोट्या व्यापार्यांमधून नगरपरिषद प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुख्याधिकार्यांकडून थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा 6 दुकांनांवर कारवाई ; 1 लाख 69 हजारांची वसूली
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:15
Rating: 5