आत्तापर्यत राज्यातील 31 कारखाने बंद
पुणे : ऊसाचे प्रचंड उत्पादन झाल्याने यंदाचा गाळप हंगाम संपत नसल्याचे चित्र दिसत आहे. मार्च महिन्याचा तिसरा आठवडा संपला तरी आत्तापर्यत राज्यातील फक्त 31 कारखाने हे बंद झाले आहे. त्यामुळे यंदा साखरेचे दुप्पटीहून अधिक उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या साखरेचे वितरण करणे हा मोठा प्रश्न साखर कारखान्यासमोर उभा राहिला आहे.गेले पाच ते सहा वर्षातील विक्रमी उत्पादन यंदा होणार आहे.आता म्हणजे 17 मार्च पर्यंत राज्यात तब्बल 944.37 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात जेमतेम 416.98 लाख क्विटल साखरेचे उत्पादन झाले होते.गेल्या वर्षी याकाळात राज्यातील दिडशे हून अधिक कारखाने बंद झाले होते पण यंदा मात्र फक्त 31 कारखाने बंद झाले आहेत.अद्यापही दिडशेहून अधिक कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे.आता साखरेचा कोटा वाढत असून कारखान्यांना गोदामे अपुरी पडत आहेत ही अतिरिक्त साखर आता कुठे ठेवायची असा प्रश्न अनेक कारखान्यापुढे उभा राहिला आहे. तर दुसरीकडे अजूनही अनेक शेतकर्यांचा उस अद्यापही शेतातच आहे.हा उस तोडून कसा न्यायचा असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.अनेक कारखान्यांची गाळप क्षमता सुद्धा संपत आली आहे.अशावेळी राहिलेल्या उसाचे काय करायचे त्याचबरोबर हा उस जर कारखान्यात गेला नाही तर गुन्हाळासाठी किंवा गुळासाठी द्यावा लागेल त्यातूून उत्पन्न फारसे मिळणार नाही त्यामुळे हा उस कारखान्यांनीच न्यावा अशी मागणी या शेतकर्यांकडून होत आहे.विशेष करुन पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकर्यांचा उस अद्याप शिल्लक आहे.