राज्यातील 1376 गावात गंभीर पाणी संकट, भूजलपातळी खालावली
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा वर्षातून चार वेळा सर्वेक्षण करते. राज्यात स्थिर भूजल पातळीच्या नोंदी घेण्यासाठी 3920 निरीक्षण विहिरी पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केल्या आहे. निरीक्षण वि हिरीतील स्थिर भूजल पातळीच्या नोंदी दरवर्षी सप्टेंबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यात घेण्यात येतात. यावर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या नोंदीतच भूजल पातळी खालावल्याने बहुतांश ठिकाणच्या विहिरी व कुपनलिका कोरड्या पडण्याच्या घटना घडत आहेत. निरीक्षण विहिरीच्या भूजल पातळीच्या अभ्यासावरून राज्यातील 1376 गावात एप्रिल ते जून 2018 पर्यत पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सुमारे 20 टक्के कमी पाऊस आणि भूजल पातळी घटल्यामुळे 1376 गावातील पाणी पातळी 3 मीटरपेक्षा कमी, 2460 गावातील भूजल पातळी 2 ते 3 मीटरपेक्षा कमी आणि 6546 गावातील भूजल पातळी 1 ते 2 मीटरपेक्षा कमी झाली आहे. राज्यात एकूण 10 हजार 382 गावात भूजल पातळीत एक मीटरहून अधिक घट झाल्याचे अहवालात नमुद केले आहे.
यामध्ये अकोला जिल्ह्यातालुके, अमरावती जिल्ह्यातील 13, बुलढाणा : 03, चंद्रपूर : 14, गडचिरोली : 06, गोंदिया 08, नागपूर 02, वर्धा :03 वाशिम : 04 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील 03 तालुके, हिंगोली : 04, जळगाव : 10, कोल्हापूर व लातुर जिल्हा प्रत्येकी 01, नांदेड :14, नंदुरबार व नाशिक जिल्हा प्रत्येकी 01, परभणी जिल्हा 07 तसेच सोलापूर जिल्ह्यातील 04 तालुक्यांचा समावेश आहे.
चार जिल्ह्यांत फ्लोराईड मिश्रीत पाणीसंपूर्ण राज्यात पूर्व विदर्भात फ्लोराईड मिश्रीत पाण्याची समस्या आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात फ्लोराईड मिश्रीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण 1.4 पीपीएमपेक्षा जास्त असल्यास आरोग्याला धोका असतो. नागपूर जिल्ह्यांत भिवापूर, पारशिवनी, कुही आणि रामटेक हे तालुके, चंद्रपूर जिल्ह्यांत वरोरा, चिमूर, राजूरा आणि कोरपना, गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, अहेरी व सिरोंचा तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये फ्लोराईड मिश्रीत पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.